मुंबई: मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने तेजी पहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्सने 509.41 अंकांनी (0.66%) वाढ केली. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 168.95 अंकांनी (0.72%) वधारला. स्मॉलकेस मॅनेजर गोलफाईच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये किती वाढ होईल?
गोलफाईच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये निफ्टी 8-10% वार्षिक परतावा देऊ शकतो. तर सेन्सेक्समध्ये 8-12% वाढ अपेक्षित आहे. या अंदाजामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे अधिक वेधले जाईल.

बँकिंग क्षेत्राला मोठा फायदा?
गोलफाईच्या मते, देशांतर्गत बाजारपेठांमध्ये असलेली स्थिरता आणि अमेरिकन टेरिफ वाढ किंवा कमोडिटी महागाई यासारख्या जोखमांपासून बचाव करण्याची क्षमता यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. लार्ज कॅप प्रायव्हेट बँकांमध्ये 2026 मध्ये 14-16% कर्जवाढ होण्याची अपेक्षा आहे. मार्च 2026 पर्यंत सेन्सेक्समध्ये 12-16% वाढ होण्याची शक्यता आहे. तर 25 मार्च 2025 पासून पुढील 12 महिन्यांत निफ्टीमध्ये 8-10% वार्षिक परतावा मिळण्याचा अंदाज आहे.
गोलफाईचा अंदाज आणि बाजारातील स्थिरता
गोलफाईचे संस्थापक आणि सीईओ रॉबिन आर्य यांनी स्पष्ट केले की, निफ्टी आणि सेन्सेक्सची ही वाढ उत्पन्न वृद्धीच्या स्थिरतेचे संकेत देते. जागतिक आणि स्थानिक घटकांचा योग्य मेळ आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा (FII) पुनर्वप्रवाह हे घटक बाजाराला गती देऊ शकतात.
कुठल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची संधी?
अहवालानुसार, धार्मिक पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन हे दोन क्षेत्र गुंतवणुकीसाठी उपयुक्त ठरू शकतात.
धार्मिक पर्यटन: कोविडपूर्व काळात वार्षिक ३० कोटींहून अधिक तीर्थयात्री देशभर प्रवास करत असत. आता या क्षेत्रात दरवर्षी 10-12% वाढ होण्याचा अंदाज आहे.
मेडिकल टुरिझम: या क्षेत्रात 18-20% वार्षिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे 2026 पर्यंत हा बाजार 13-15 अब्ज डॉलर्सच्या स्तरावर पोहोचेल.
पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक
अहवालानुसार, 2030 पर्यंत 100 नवीन विमानतळ आणि 8-10% वार्षिक रस्ते विस्तार यांसारख्या पायाभूत प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. यामुळे देशातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि उद्योगांना पाठिंबा मिळेल.
ग्रामीण मागणीत 5-7% वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे. तर शहरी खर्च 6-8% दराने वाढेल. त्याचबरोबर, खाजगी भांडवली खर्च (CapEx) दरवर्षी 12-14% वाढण्याची शक्यता आहे.
गुंतवणूकदारांसाठी संधी
एकूणच शेअर बाजारातील स्थिरता, जागतिक आणि स्थानिक आर्थिक घटकांचा योग्य मेळ, तसेच गुंतवणुकीला पोषक वातावरण या सर्व बाबी लक्षात घेता 2026 पर्यंत शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी चांगला नफा देणारा ठरू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी योग्य क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करावा.