लासलगाव, नाशिक: कांद्याचे दर हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतर काहीसा दिलासा मिळेल असं वाटत होत मात्र त्याचा काही विशेष परिणाम झालेला नाही. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत प्रति क्विंटल 250 ते 300 रुपये प्रति क्विंटल कांद्यात घसरण झाली. कांद्याचे दर कोसळत असल्यानं शेतकरीवर्ग हवालदिल आहे. 1000 ते 1200 प्रति क्विंटल या स्वरूपाचा दर सध्या पाहायला मिळत आहे.
ऊन्हाळी कांद्याची आवक वाढल्याचा परिणाम
सरकारनं कांदा निर्यात जास्त व्हावी, यासाठी कांदा निर्यातीवर अनुदान जाहीर करावं, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. महाराष्ट्रसह गुजरात,मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातून बाजापेठांमध्ये नवीन उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्याचाच परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

कांद्याची बाजारात मुबलकता
देशात यंदा रब्बी हंगामात 227 लाख टन कांदा उत्पादन होण्याची शक्यता आहे. गतवर्षी 192 लाख टन कांदा उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा कांदा उत्पादनात 18 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात रब्बी हंगामातील कांद्याचा वाटा 75 टक्क्यांपर्यंत असतो. यंदा कांद्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात असल्यानं यंदा कांद्याचे दर स्थिर राहण्याचा अंदाज आहे. कांद्याचा तुटवडा होणार नाही. तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये काढणीस येणाऱ्या खरीप हंगामातील कांदा बाजारात येईपर्यंत देशांतर्गत कांद्याची उपलब्धता चांगली राहील, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागानं दिली आहे.परिणामी यावर्षी कांदा उत्पादकांना कमी दरातच आपला कांदा विकावा लागणार असं चित्र सध्या दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडेल.
कांद्यावरील निर्यात बंदी उठल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेला मुठमाती मिळालेली आहे. आज मी लासलगाव बाजार समितीत कांदा घेऊन आलो. माझ्या लाल कांद्याला केवळ 1 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. यात माझा उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. गेल्या आठ दिवसापासून कांद्यात मोठी घसरण झाली. बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं भाव कोसळले आहेत. आमच्या कांद्याला 2500 ते 2800 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, अशी आमची मागणी केली जात आहे.