राज्याला वळवाच्या पावसाने झोडपलं; 23 हजार 331 हेक्टर क्षेत्र बाधित, बळीराजा संकटात!

राज्याला वळीवाच्या पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. जवळपास 23 हजार हेक्टरवरील शेती क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. बागायती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे...

मुंबई:  राज्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळताना दिसत आहे. यामुळे बागायती तसेच इतर पिकांना फटका बसला आहे. दर दोन-तीन दिवसांनी राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात पाऊस पडत आहे. फक्त रिमझिम सरी नाही, तर धोधो पाऊस पडतो आहे.  पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह नाशिकमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पिकांचं नुकसान, जीवितहानी झाली.

कुठे अन् किती नुकसान ?

भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात वित्तहानीसोबतच जीवितहानी देखील झाली. माणसे, जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले. अमरावतीमध्ये सर्वाधिक नुकसान आतापर्यंत झाले आहे. उन्हाळ्यात बाजारपेठांमध्ये धान्य आणि इतरही पदार्थ बाहेरच असतात, त्यांचीही नासाडी अवकाळी पावसामुळे झाली.

तिकडे कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे शहरामधील मध्यमवर्ग सुखावत असला, घराबाहेर पडता येत नाही म्हणून थोडा नाराज आणि बाहेर असेल तर थोडी फजिती झाल्यामुळे चिडचिड करत असला तरी शेतकर्‍यांचे किती आणि कसे नुकसान झाले हे अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

अवकाळीचा सर्वाधिक फटका विदर्भातील अमरावती जिल्ह्याला बसला आहे. साधारण 11 हजार हेक्टरवरील पिकांचे आतापर्यंत नुकसान झाले. संत्रा, कांदा, ज्वारी, मूग आणि केळी पिकांचे नुकसान झाले आहे. असाच फटका नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला बसला. 4 हजार 396 हेक्टरवरील मका, ज्वारी, बाजरी, कांदा, केळी यासह अनेक पिकांना फटका बसला. पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे.

जिल्हानिरहाय नुकसानीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

अमरावती    10,888

जळगाव         4,396

नाशिक          1,787

जालना           1,695

चंद्रपूर            1,038

पुणे                  480

सोलापूर            143

अहमदनगर         14

नुकसान वाढण्याची शक्यता

आगामी दिवसांत हे नुकसान आणखी मोाठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारण, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने आणखी नुकसान वाढण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुढे सहा दिवसांसाठी राज्याला पावसाचा इशारा दिला आहे. आज देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News