राज्याला पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे उष्णता काहीशी कमी होत असताना कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. काल दिवसभरात अवकाळी पावसामुळे मराठवाडा, विदर्भ , मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मोठं नुकसान झालं. मोठी वित्तहानी झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली.
मध्य महाराष्ट्राला झोडपले!
पुणे जिल्ह्यात 5 मे रोजी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः जुन्नर आणि मुळशी तालुक्यात कांदा, भुईमूग आणि इतर उन्हाळी पिकांना फटका बसल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही तुरळक स्वरूपात पाऊस झाला, परंतु त्यामुळे मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने सोमवारी झोडपून काढले. सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली. परिणामी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाडा, विदर्भात पिकांचं नुकसान
सोमवारी हिंगोली, परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे अवकाळी पाऊस यासह काही ठिकाणी गारपीट झाली. मोठ्या प्रमाणात शेतातील केळीच्या बागांना झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्या आहेत. जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा दांडेगाव वडगाव या शिवारामध्ये वादळी वाऱ्याचा केळीच्या बागांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे.
तिकडे पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात वादळी वारा, हलक्या गारपीटसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळं शेतातील हातात आलेलं भातपिकाला याचा जबर फटका बसलाय. लोंबी भरलेला आणि चार दिवसांवर भातपीक कापून कर्जाची परतफेड करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांचं भात पीक अक्षरशः या अवकाळी पावसानं जमीनदोस्त झालं आहे. महसूल प्रशासनाने शेत बांधावर पोहचून नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावे आणि शक्य तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पुढील 4 दिवस धोक्याचे
आगामी 4 दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सौम्य ते मुसळधार अशा स्वरूपाचा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या काळात गारपीट देखील होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी काढणीस आलेल्या पिकांचं, आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे बागायतदार शेतकरी तसेच भात उत्पादक शेतकरी सध्या चिंतातूर असल्याचं पाहायला मिळत आहे.