रायगड : गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा शुक्रवारी मुक्काम पुण्यात होता. शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिधीनिमित्त अमित शाहा सकाळी रायगडावर जाणार आहेत. रायगड किल्यावर ते शिवाजी महाराजांना अभिवादन करतीली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहे.
रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी ते राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर ते किल्ले रायगडावर पुढील कार्यक्रमासाठी जातील.

सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शाह यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे शहा हे तटकरेंच्या रोह्यातील घरी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत. या स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे, मंत्री उदय सामंत, भरत गोगावले हेही उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. शिवसेना भरत गोगावलेंसाठी रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला ते देखील हे पद हवे आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शिंदेंच्या नाराजीनाट्यानंतर नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे सुनील तटकरे डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून अमित शाहांच्या उपस्थित हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा आहे.
मुंबईत संध्याकाळी बैठकांचं सत्र
अमित शाह हे रायगडवरून मुंबईकडे रवाना होणार आहेत. तेथे ते एका कार्यक्रमाला तेथे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोनही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधणार आहेत.