वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात आता धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. हा अहवाल बी.जे. मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल, पुणे येथून जारी करण्यात आला आहे. हा मृत्यूचा वैद्यकीय अहवाल आहे. फॉरेन्सिक वैद्यकशास्त्राचा या अहवालाला आधार आहे. यामध्ये मृत 24 वर्षीय वैष्णवी हगवणेचा मृत्यू संशयास्पद रित्या झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
वैष्णवीची हत्या झाली का?
हा अहवाल संशयास्पद मृत्यू असल्याचे स्पष्ट करतो. वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आहे, आणि तिच्या शरीरावर मारहाणीचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे खूनाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुढील तपास व रासायनिक विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे आहे. अहवालाबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णवीच्या मृत्यूचे प्राथमिक कारण गळ्याभोवती लिगेचर कॉम्प्रेशन म्हणजे गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.शरीरावर अनेक ठिकाणी तीव्र मारहाण झाली असल्याचे पुरावे आहेत. अंतर्गत अवयव व उत्सर्जित रसायने तपासणीसाठी जप्त करण्यात आली आहेत. रासायनिक विश्लेषणासाठी नमुने राखून ठेवले आहेत.

घटनेतील आरोपी अटकेत
वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामुळे बरंच वातावरण ढवळून निघालं आहे, हा हुंडाबळी असल्याचं स्पष्ट दिसत आहे, या प्रकरणी सासू, पती आणि नणंद सुरूवातीपासून अटकेत होते. तर पुढे दिर सुशील हगवणे आणि सासरा राजेंद्र हगवणे यांना देखील पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. त्यांना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेबाबत राज्यभरात तीव्र संताप पाहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत वैष्णवीच्या आई -वडिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.