Shivsena Meeting – राज्यात महायुती सरकार येऊन ६ महिने उलटून गेले तरीसुद्धा अजूनही रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटताना नाव घेत नाही आहे. दोन्ही जिल्ह्यात तिन्ही पक्षातील नेते पालकमंत्री पदावर दावा करतात. दरम्यान रायगड जिल्ह्यातील अदिती तटकरे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून नावाची घोषणा केली होती.
परंतु शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी तिथे दावा केल्यानंतर अदिती तटकरे यांचे नाव मागे घेण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरुन वाद सुरु असून, आज त्यातून तोडगा निघण्याची शक्यता आहे.

बैठकीतून तोडगा निघणार?
दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथी गृह येथे आहे. ही बैठक झाल्यानंतर 1 वाजता शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यतः रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून चर्चा होणार असल्याचे बोलले जातेय. नुकतंच मंत्री भरत गोगावले यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी हवेत नॅपकिन वर उडवत सुनील तटकरे यांना जशास तसे उत्तर दिले.
महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता…
एकीकडे रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील ही पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. त्यामुळे त्याच्यावर ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीते गृह पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. आगामी मुस्लिम बांधवांचा ईद सण आहे, त्याबाबत कायदा आणि सुव्यवस्था आणि उपाययोजना, तसेच कोरोनाचे वाढते रुग्ण याबाबत सरकार काही मार्गदर्शन सूचना किंवा ठोस निर्णय घेण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.