कोल्हापूर – शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आणखी एक ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरणाकडून सध्या किल्ल्यावर उत्खनन सुरू आहे. या उत्खननात यंत्रराज हे ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण सापडलंय. संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
या यंत्रराजचा वापर खगोलशास्त्राचा अभ्यास करणे सोपे व्हावे यासाठी त्या काळी करण्यात येत होता. अक्षांश, रेखांश, विषववृत्त यासारख्या बाबींचा अभ्यास त्याकाळी होत होता, हे या यंत्राच्या माध्यमानं स्पष्ट झालंय.

काय आहे यंत्रराज?
प्राचीन कालातही ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करण्यात येत होता. दिशांचा वेध घेण्यासाठी, वेळ मोजण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी हे यंत्र वापरण्यात येत होतं. इंग्रजीत या यंत्राचं नाव Astrolabe असं आहे. याला यंत्रराज किंवा सौम्ययंत्र या नावानंही ओळखलं जातं. किल्ले रायगड बांधताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर केला गेला असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय.
कुठं सापडलं यंत्रराज ?
संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत पोस्ट लिहिली असून, त्यात किल्ले रायगडावर गेल्या तीन ते चार वर्षांपासून गडाच्या विविध भागात उत्खनन होत असल्याचा उल्लेख केलाय. रोपवे परिसर, कुशावर्त तलाव,बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर परिसरात जुन्या काळात अनेक वाडे होते. अशा सुमारे १० ते १२ शिवकालीन वाड्यांच्या परिसरात हे उत्खनन करण्यात आलं. यात प्रामुख्यानं कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात ऐतिहासिक वाड्याच्या जागी उत्खनन करताना हे प्राचीन यंत्रराज सापडलं आहे.
कसं आहे यंत्रराज?
या यंत्रावर काही अक्षरे कोरलेली आहेत. मध्यमागी कासव आणि साप अशा दोन प्राण्यांची चिन्हही कोरलेली आहेत. त्यांचे मुख आणि शेपटी कोणत्या भागात असावी, हे समजण्यासाठी मुख आणि पूंछ अशी अक्षरंही कोरलेली आहेत. यावरुन उत्तर आणि दक्षिणेचा अंदाज बांधणे शक्य होते. या यंत्रराजच्या शोधामुळे इतिहास संशोधकांना आता पुढील संशोधनाची संधी उपल्बध झाल्याचंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.