नागपूर: राज्यात मोठा शिक्षक भरती घोटाळा उघड झाला आहे. उपराजधानी नागपुरातील 580 शिक्षक भरती घोटाळ्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकारामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा आर्थिक भुर्दंड सहन कारावा लागला आहे. दुसरीकडे या बोगस भरतीला खुद्द शिक्षण विभागाने देखील दुजोरा दिलेला आहे. आता मात्र या प्रकरणाची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे, त्यांनी या प्रकरणी आता कसून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
मृत अधिकाऱ्यांची सही वापरत कारभार:
या घोटाळ्याची गंभीरता यावरून लक्षात येते की तत्कालीन काही मृत अधिकाऱ्यांची सही वापरत अनेक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. अनेक कागदपत्रं या खोट्या सह्यांचा वापर करून करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आता अधिक तपास सुरू आहे.

बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख?
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तापासअंती सर्व 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. दुसरीकडे त्यांना देण्यात आलेल्या वेतनाची वसूली देखील करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाला कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहे. बनावट आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे. नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.
महत्वाचा पुरावा हाती:
आता या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची एक ऑडीओ क्लिप समोर आली आहे. बोगस कागदपत्रांबाबत या ऑडीओ क्लिपमध्ये उल्लेख असल्याचं समजत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासामध्ये ही ऑडीओ क्लिप महत्वाचा पुरावा ठरणार आहे.