मुंबई : तमाशा कला ही लोककला म्हणून ओळखली जाते. तमाशा कलावंत हे गावोगावी फिरत आपला तमाशा सादर करतात आणि या तमाशावरती आपला उदरनिर्वाह करतात. तमाशा ही महाराष्ट्राची कलेची ओळख असल्याचे मानले जाते. दरम्यान कोरोनानंतर सर्वच क्षेत्रासमोर विविध आव्हाने उभी राहिली आहेत, तशीच आव्हाने लोककलावंत आणि तमाशा कलावंतासमोरही आहेत. त्यामुळे तमाशामधील कलावंतांचे समोर जे आव्हान आहे. समस्या आहेत, त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे
अहवाल सादर करण्याचे निर्देश…
दरम्यान, तमाशा फड आणि त्यातील कलावंत हे राज्यभर दौरे करतात. गाव खेड्यात भटकून आपला उदनिर्वाह चालवतात. या तमाशातील कलाकारांचे अनेक समस्या आहेत… आव्हाने आहेत… या लोककला तसेच या कलेवर उपजीविका करणारे सर्व घटक यांचा विचार करुन भविष्यात सरकारने करावयाच्या उपाययोजना याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. दरम्यान, तमाशा कलावंतांचे प्रश्न, समस्या यावर अभ्यास करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे. एक महिन्यात या समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी विभागाला दिले आहेत.
कलेला प्रोत्साहन दिले जाईल…
तमाशा सादरीकरणातही अनेक अत्याधुनिक साधनांचा वापर होऊ लागला असून, पारंपरिक तमाशा आणि आजचा तमाशा यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत. यामुळे एकीकडे तमाशा कलावंत, कला केंद्रचालक यांच्या समोर आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनानंतर तमाशा कलावंताना रोजगाराच्या अनेक संधी गमवाव्या लागत आहेत. तसेच काही कलावंत हे या क्षेत्रातून अन्य क्षेत्राकडे वळले. त्यामुळे ढोलकी वादकांपासून विविध कला कौशल्य असलेले कलाकार आज मिळत नाहीत, अशी अडचण निर्माण झाल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. तसेच कला केंद्र चालवताना असंख्य अडचणी येत असून भविष्यात कला केंद्र व ही कला टिकवून ठेवणे मोठे आव्हान आहे. तर दुसरीकडे ही कला पारंपरिक दृष्टीने टिकून ठेवणे सुध्दा महत्त्वाचे असल्याने याबाबतही या सगळ्या कलावंत व त्यांच्या संघटनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पण तमाशा कलाही महाराष्ट्रात टिकावे आणि आगामी काळात त्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी दिले. लोकनाट्य कलाकार व कला केंद्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा करुन त्यांचे म्हणणे मंत्री शेलार यांनी ऐकून घेतले.
