पुणे : बारावीमध्ये आर्ट (कला शाखा) सर्वात सोपी समजली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे पूर्वी आर्टला अॅडमीशन घेऊन वर्षभर घरीच अभ्यास करून परीक्षेला येत होते. तर, सायन्स ही हुशार विद्यार्थ्यांची मक्केदारी असलेली शाखा असा समज होता. या शाखेचा निकाला देखील कमी लागत होता. मात्र, मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहिली तर हा समज खोटा ठरत असल्याचे दिसून येते.
यंदा बारावीच्या निकालात सर्वात कमी निकाल हा आर्ट शाखेचा लागला आहे. या शाखेतील विद्यार्थी पास होण्याचे प्रमाण हे 80.52 टक्के आहे तर, विज्ञान (सायन्स) शाखेचे विद्यार्थी पास होण्याचे यंदाचे प्रमाण हे तब्बल 97.35 टक्के आहे. त्यामुळे कला शाखा अवघड आणि विज्ञान शाखा सोपी असेच म्हणण्याची वेळ आहे.

वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा
मागील काही वर्षांत आर्टकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. त्यामुळेच आर्ट शाखेचा निकाल कमी लागत असल्याची चर्चा देखील शिक्षण तज्ज्ञांमध्ये आहे. वाणिज्य शाखेचा या वर्षीचा निकाल हा 92.68 टक्के लागला आहे. त्यानंतर आयटीआयचा निकाल 82.03 टक्के तर व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा निकाल 83.26 टक्के लागला आहे.
कला शाखेची घसरण
कला शाखेचा 2022 मध्ये बारावीचा निकाल हा 90.51 टक्के होता. मात्र, 2023 मध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि त्या वर्षी निकाल 84 टक्के लागला तर, 2024 मध्ये या निकालात एका टक्क्यानी वाढ झाली आणि निकाल 85.88 टक्के लागला. मात्र, यंदा पुन्हा पाच टक्क्यांची घसरण होत निकाल 80.52 टक्के लागला. ही घसरण कशामुळे होत आहे याचे ठोस कारण नाही मात्र हुशार विद्यार्थ्यांचा ओढा हा विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे असल्याने कला शाखेत ही घसरण होत असल्याचा अंदाज आहे.