मुंबई : मशिदीच्या नावे जमिनी हडपणं आणि अवैध भोंगे चालणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका भाजपाचे माजी खासदार आणि आक्रमक नेते किरीट सोमय्या यांनी घेतली आहे. मविआ आघाडीतील नेत्यांची भ्रष्टाचारांची प्रकरणं, ईडी कारवायांबाबत तक्रारी, बांगलादेशी घुसखोरांबाबत मोहीम या सगळ्यांनी चर्चेत असलेले सोमय्या यांनी नवी आघाडी उघडली आहे.
मुंबईतील मशिदींवर असलेल्या भोंग्यांच्या विरोधात आता किरीट सोमय्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. गोवंजी परिसरात 72 मशिदींवर लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या विरोधात सोमय्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर सोमय्यांना मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीवर कारवाईची मागणीही सोमय्यांनी केली आहे.

अन्सारीवर कारवाई करा – सोमय्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या भोंग्याबाबतच्या नियमांचे पालन व्हावे, अशी मागणी करत किरीट सोमय्या मैदानात उतरले आहेत. सोमय्यांनी भोंग्यांविरोधात आणि जमिनींविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांच्या कार्यालयात धमकीचा फोन आला होता. हजरत ख्वाजा गरीब नवाज महाराष्ट्र कमिटीचे युसुफ अन्सारी यांनी हा कॉल केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अन्सारी यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्यांनी केलीय. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य ती कारवाई करतील असंही सोमय्या म्हणाले आहेत.
बांगलादेशी घुसखोर आणि लँड जिहादबाबतही आक्रमक
मशिदीवरील भोंग्यांप्रमाणेच मशिदींच्या नावाखाली लँड जिहाद सुरु असल्याचं सांगत, यावर कारवाई होईल, असंही किरीट सोमय्या म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात नियमावली जारी केली असून, भोंगे आणि जमिनींबाबत आदेशानं कारवाई होईल, असं सोमय्या यांचं म्हणणं आहे.
मनसेकडून सोमय्यांच्या भूमिकेचं स्वागत
मशिदीवरील भोंग्यावरुन यापूर्वी मनसे आक्रमक झाली होती. आता सोमय्या आक्रमक झाल्यानंतर त्यांच्या या भूमिकेचं स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली आहे. सोमय्या यांना आवश्यकता भासल्यास त्यांना हातभार लावू असं देशपांडे म्हणालेत. सगळ्यांनीच मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय.
काही दिवसांपासून बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही सोमय्या आक्रमक असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना भेटी देत त्या त्या जिल्ह्यातील बांगलादेशी घुसखोरांची समस्या सोमय्यांनी मांडली आहे.