mumbai – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाव आल्यामुळे पोलीस महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर गृह विभागाकडून मोठी कारवाई केली आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला आहे. गृह विभागाने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शासन आदेश काय म्हटलेय?
दुसरीकडे जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजी नगर, नाशिक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृह विभागाने शासन आदेश जारी केला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडे “विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील पाच पदापैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा(नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार आहे.

सुपेकर याचे नाते काय?
दम्यान, वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांच्या पत्रकार परिषदेनंतर गृहविभागाने सुपेकर यांच्यावर तातडीने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पोलीस महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांच्या नावाचा उल्लेख करत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मुलाच्या जन्मपत्रिकेत जालिंदर सुपेकर यांचा मामा असा उल्लेख असल्याचे वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांनी सांगितले आहे.