Chhatrapati Shivaji Maharaj Forts – छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राचा समृद्ध वारसा कायमस्वरुपी जागतिक पटलावर नोंदवला जाणे, हा महाराष्ट्र राज्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.

केंद्राची मदत…
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महानिदेशक यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व संस्कृती मंत्रालय यांनी ‘युनेस्को’ कडे हा प्रस्ताव पाठविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. नवी दिल्ली येथे जुलै २०२४ मध्ये झालेल्या ‘युनेस्को’ च्या ४६ व्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनातील अधिकारी, गड संवर्धन समितीचे सदस्य व विद्यापीठातील तज्ज्ञांनी पूर्वतयारी म्हणून सहभाग नोंदविला होता. नामांकन प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्याकरिता जागतिक स्मारके व स्थळांची परिषदेनं १२ किल्ल्यांना भेट दिली होती.
मुख्यमंत्र्यांचे टिव्ट…
या आनंदी बातमीनंतर मुख्यमंत्र्यांनी पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. गौरवशाली क्षण !!!आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना
महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा !!!!
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे, शिवप्रेमींचे मन:पूर्वक अभिनंदन…
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत!
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
स्वराज्यनिर्मिती आणि ते टिकविण्यासाठी महाराजांनी हे किल्लेवैभव उभारले. शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्यशास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही किल्ल्यात दिसून येत नाही. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्धकौशल्याचा मुत्सद्दीनीतीने रचलेला भाग आहे. हेच ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ आहे.
हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार…
सर्वप्रथम मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मी स्वत: विविध राजदुतांशी संपर्क केला. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही वेळोवेळी साथ दिली. माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली.
तेथे तांत्रिक सादरीकरण केले. माझ्या कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला आहे. मी पुन:श्च महाराष्ट्रातील सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो.
॥ छत्रपती शिवाजी महाराज की जय ॥