राज्यात मे महिन्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण आहे. दुपारनंतर काही भागात पाऊस आणि गारपीट होत आहे. कधी ऊन कधी पाऊस असं विचित्र वातावरण सध्या राज्यात निर्माण झालं आहे. आता हवामान विभागाकडून राज्याला पुढील चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमका काय अंदाज आहे पावसाचा? सविस्तर जाणून घेऊ…
पुढील चार दिवस पाऊस बरसणार
पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 40 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. इथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे.

राज्यात 19 मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात लवकरच मान्सूनच्या सरी?
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान-निकोबार बेट समूह व्यापला आहे. बंगालच्या उपसागराच्या वारे वाहायला सुरुवात झाली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टीच्या भागात बुधवारपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होईल. त्यामुळे गुरुवारपर्यंतया कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. लवकरच केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होणार आहे, त्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू होईल, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.