पुणे : काँग्रेसचे भोर-मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडण्याच निर्णय आज जाहीर केला. थोपटेंनी दोन दिवसांपूर्वी आपला राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिला होता. आज (रविवारी) पत्रकार परिषद घेत थोपटेंनी पक्ष सोडण्याचे वेळी पक्षानेच आपल्यावर आणल्याचे सांगितले.
पक्षाने आपल्याला संधीच दिली नाही. विरोधी पक्षनेतेपद, कार्याध्यक्षपद संधी असताना देखील डावले गेले, अशी मनातील खदखद थोपटेंनी बोलून दाखवली. त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्याने भोर-मुळशी-वेल्हेमध्ये काँग्रेसचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे.

संग्राम थोपटे हे मागील काही दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्यांनी भोर आणि मुळशी तालुक्यातील आपल्या समर्थकांची बैठक सुद्धा बोलावली होती. या बैठकीतमध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का
पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसशी एकनिष्ठ घराणे म्हणून थोपटे घराण्याचा उल्लेख केला जातो. संग्राम थोपटेंचे वडील आनंत थोपटे हे काँग्रेसकडून तब्बल सहा वेळा आमदार झाले होते. तर संग्राम थोपटे सलग तीन वेळा आमदार झाले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी थोपटेंचा पराभव केल्याने मुळशी तालुक्यातील राजकीय गणितं बदलली.
शरद पवारांना घेरण्याचा प्लॅन
बारामती लोकसभा मतदारसंघात मुळशी-भोर मतदारसंघ येतो. या मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांना नेहमीच मताधिक्क मिळालेले आहे. बारामती जिंकणे हे भाजपचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न आहे. त्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांना घेरण्यासाठी संग्राम थोपटे यांचा मोठा उपयोग भाजपला होऊ शकतो.