संभाजीनगर – वैजापूर गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला शनिवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री आगीचे लोळ उठू लागल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीनं पुढं येत आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री बँकेत स्फोट झाल्यानं ही आगीची घटना घडल्याचं समोर येऊ लागली. नंतर तपासात चोरट्यांनी केलेल्या चोरीच्या प्रयत्नात आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
बँक लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी बँकेत स्फोट झाल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांना हे समजताच त्यांनी सतर्कतेनं तपास सुरु केला, त्यात चोरट्यांनी वापरलेली कार पोलिसांच्या हाती लागली आहे.

नेमका काय घडला प्रकार
वैजापूरमध्ये असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा लुटण्यासाठी चोरट्यांनी टोळी मध्यरात्री गावात पोहचली. त्यांनी बँकेत प्रवेशही मिळवला. मात्र बँकेतील लॉकर तोडताना वापरलेल्या गॅस कटरचा स्फोट झाला आणि बँकेला आग लागली. थोड्याच वेळात या आगीनं उग्र रुप धारण केलं. बँक चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा प्लॅन उघडकीस येण्याची स्थिती निर्माण झाली, त्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळावरुन पळ काढला.
चोरट्यांची कार पकडली
पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर त्यांना या प्रकाराची कल्पना आली. त्यांनी तातडीनं तपास सुरु केला. चोरट्यांनी वापर केलेली कार पोलिसांनी हस्तगत केलीय. या कारमधून चोरीसाठी लागणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्यात. गॅस कटरही पोलिसांना सापडलं आहे. आता पोलिसांची तीन पथकं या चोरट्यांच्या मागावर आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांना जेरबंद करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरुये.