सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन ५० सायबर पोलीस ठाणे, गेल्या वर्षी फसवणुकीतील ४४०.३७ कोटी रूपये वाचविले

लॅपटॉप, संगणक, मोबाईल यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत. तशी फसवणूकही वाढली आहे.

मुंबई : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया वाढल्यामुळं सायबर गुन्हेगारी पर्यायाने सायबर  फसवणुकीच्या प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसताहेत. या सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि सायबर फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासन विविध पातळ्यांवर आणि अनेक माध्यमातून काम करीत आहे. याच धरतीवर राज्यामध्ये नवीन ५० सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा आयुक्त स्तरावर सायबर लॅबची स्थापना करण्यात येत आहे. लॅबमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असणार आहेत. तसेच जागतिक स्तरावरील अत्याधुनिक आणि क्रांतिकारी उपक्रम महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ३ लाख ३२ हजार ५३८ तक्रारी…

दरम्यान, सायबर गुन्हे वाढल्यामुळं ते रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. कारण सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवनवीन क्लृप्त्या अवलंबत असतात. दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारी ते ‍‍डिसेंबर २०२४ या दरम्यान, महाराष्ट्र सायबर कार्यालयातील एनसीआरओ पोर्टल आणि सायबर हेल्पलाईन १९३० या नंबरवर एकूण ३ लाख ३२ हजार ५३८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील फसवणुकीच्या रक्कमेपैकी ४४०.३७ कोटी रूपये वाचविण्यात आले आहेत. म्हणजे एवढी रक्कम सरकारने सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून वाचविली आहे.

टोल फ्री क्रमांक १९३० तक्रार दाखल…

दुसरीकडे सायबर गुन्हेगारी हे मोठ्या प्रमाणात भारत आणि जगभरात वाढत आहे. त्यामुळं सुरक्षा यंत्रणावर ताण येत आहे. तसेच ही गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान जगभरातील पोलिसांसमोर आहे. लॅपटॉप, संगणक, मोबाईल यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत. तशी फसवणूकही वाढली आहे. शासनाने नागरिकांची होणारी फसवणूक थांबविण्याच्यादृष्टीने http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आणि टोल फ्री क्रमांक १९३० वर आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तात्काळ तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नॅशनल क्राईम रिर्पोंटींग पोर्टलवरची २०२४ मधील आकडेवारी…
  • ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई शहरात २ पुणे शहरात १२५ व ठाणे शहरात ८६२  सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
  • आर्थिक फसवणूक झालेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये ८३८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे
  • ९४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
  • संपूर्ण राज्यात एकंदरीत सायबर गुन्ह्यांमध्ये १ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, त्यामध्ये १ आरोपीला अटक करण्यात आली आहे.

About Author

Astha Sutar

Other Latest News