पुणे : गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अंलकार पोलिस मृत तनिषाच्या नातेवाईकांनी डॉ घैसास यांच्या विरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणाला 17 दिवस झाल्यानंतर शनिवारी (ता.19) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.
तनिषा भिसेच्या मृत्यूप्रकरणी डॉ.घैसास यांची चौकशी होणार असून त्यासाठी पुणे पोलिस त्याना उद्या नोटीस पाठवणार आहेत.तसेच डॉ. घैसास यांचा जबाब देखील नोंदवणार आहेत.तनिषाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पाच तास थांबवून उपचार न केल्याचा तसेच 10 लाख डिपाॅझिट मागितल्याचा आरोप घैसास यांच्यावर करण्यात येत आहे.

ससूनच्या समितीकडून अहवालात काय?
पुणे पोलिसांनी तनिषा भिसे प्रकरणात चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाला चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ससूनने चौकशी समिती नेमली होती. या समितीची अहवाल नुकताच सादर करण्यात आला. समितीने उपचारामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा करण्याबाबत डाॅ.घैसास यांच्यावर ठपका ठेवला आहे. तसेच तनिषाचे उपचार झालेल्या इंदिरा आयव्हीएफ सेंटर, सूर्या रुग्णालय यांच्या उपचार पद्धतीवर ताशेरे ओढले. सूर्यामध्ये उपचार होत असताना तेथे ह्रदय रोग तज्ज्ञ नव्हता, असे देखील अहवालात म्हटले आहे. मणिपाल रुग्णालयात तनिषाचा मृत्यू झाला मात्र पोर्टमार्टम न करता आल्याने मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
चार समित्यांचे अहवाल जमा
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात चौकशी करण्यासाठी एकुण चार चौकशी समित्या नेमण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवला होता. तसेच धर्मादाय आयुक्तांच्य समितीने देखील मंगशेकर रुग्णालयाकडून नियमांचे पालन झाले नसल्याचे म्हटले होते. माता मृत्य समितीने तनिषाच्य मृत्यूचे शास्त्रीय कारण समोर आणले होते. तर, ससून रुग्णालयाच्या समितीने ज्या ज्या रुग्णालयात तनिषावर उपचार झाले त्या सर्व रुग्णालयाच्या तनिषाच्या उपचाराचे कागदपत्रे पाहून आपला निष्कर्ष नोंदवला होता.