मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निशाण्यावर उत्तर भारतीय नेहमीच असतात. महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी तरुणांना नोकरीचा आग्रह मनसेकडून धरला जातो. त्यातूनच अनेकदा उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून माराहणीचे प्रकार देखील घडले आहे. त्यातूनच उत्तर भारतीयांच्या विरोधात द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत मनसे मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे.

उत्तर भारतीय विकाससेना नावाच्या पक्षाचे नेते सुनील शुल्का यांनी ही याचिका केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी आपल्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप शुक्ला यांनी केला आहे. शुक्ला यांचा पक्ष मुंबईतच असून ते मुंबईचेच रहिवासी आहेत.
मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांची चिथावणी असते. ते उत्तर भारतीयांच्या विरोधीतील हिंसेला पाठींबा देत असून त्यांच्या पक्षाच्या मान्यता रद्द करावी. त्यासाठी राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी मागणी शुक्ला यांनी याचिकेतून केली आहे.
गेल्यावर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयावर हल्ला केला होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी दिली असल्याची तक्रार सुनील शुक्ला यांनी पोलिसांमध्ये केली आहे. फोन तसेच सोशल मिडीयावरून आपल्याला धमकावले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हा भाजपचा डाव – देशपांडे
मनसेवर होत असलेले आरोप हा भाजपचा डाव असल्याचा आरोप मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. प्रादेशिक पक्ष वाढू न देण्याचे भाजपचे धोरण आहे त्यामुळेच हे मनसे विरुद्ध षडयंत्र भाजपने रचल्याचे देशपांडे म्हणाले. दरम्यान, देशपांडे यांनी केलेले आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळले आहेत.
शिवसेनेकडून मनसे टार्गेट
संदीप देशपांडे यांनी भाजपवर षडयंत्र रचल्याचा आरोप केला असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील नेते संजय निरुपम यांनी मनसेवर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठी भाषेचा आग्रह करणे यामध्ये मनसे काही चुकीचे करते असे नाही. मात्र, आग्रहाच्या नावाखाली ते गुंडागर्दी करत आहेत. मनसेच्या गुंडावर कारवाई झालीच पाहिजे. शहरात नवीन आलेल्यांना मारहाण करणे चुकीचे आहे त्यामुळे त्यांनी आत्ता कोर्टाच्या कारवाईला समोर जाण्याची तयारी ठेवावी. कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
मराठी अमराठी वाद पेटणार
मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपला मराठी मतदार परत मिळवण्यासाठी रणनिती आखली जात आहे. त्यातच भाजपकडून मराठी मतदारांसोबत हिंदी, गुजराती भाषित मतदारांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद वाढण्याची शक्यता आहे.