सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असले की आपल्या दरेगावी जातात, अशी चर्चा असते. मात्र, मागील तीन दिवसांपासून आपल्या सातारा जिल्ह्यातील दरेगावी असलेले उपमुख्यमंत्री शिंदे नाराजीमुळे गावी आले आहेत की आराम करायला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, मागील तीन दिवसांपासून गावी असलेले शिंदे शेतीकामात रमलेले दिसले.
एकनाथ शिंदें यांनी आपल्या गावात शेती करण्यात व्यग्र असलेले काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यामध्ये फावडे आणि झारी हातात घेऊन फळ झाडाची लागवड करताा दिसत आहे.त्यांच्यासोबत गावातील काही नागरिक देखील दिसत आहेत.

आवोकाडोची लागवड
शिंदें यांनी सोशल मीडियातून सांगितले की, सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या गावी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या आवाकाडो फळाची लागवड करण्यात केली. दरवर्षी गावी गेल्यावर आपल्या सहकाऱ्यांसोबत एका तरी नव्या झाडाची लागवड करतो. यापूर्वी स्ट्रॉबेरी, हळद, चिक्कू आणि बांबूची लागवड केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच आवाकाडो या परदेशी फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पहिल्या प्रयत्नात मी स्वतः हातात फावडे आणि झारी घेत आवाकाडोचे झाड लावले.
विकास कामांचा आढावा
सातारा जिल्ह्यातील दरेगावी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा देखील एकनाथ शिंदेंनी घेतला. तसेच कोयनेच्या बॅकवॉटर मध्ये ज्या ठिकाणी पाणी कमी झाले आहे आणि भूभाग उथळ झालेला आहे अशा ठिकाणी दोन वर्षांमध्ये गाळ काढण्याचे काम झाले होते. यावर्षीही त्याठिकाणी पुन्हा गाळ काढण्यात यावा असे निर्देश यावेळी दिले. विकासकामांचा शिंदेंनी आढावा घेतला त्यावेळी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होत्या.
माढ्याचा दौरा टाळला
उपमुख्यमंत्री शिंदे आज (सोमवारी) शिवसेनेच्या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जाणार होते. शिवाजी सावंत यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नियोजित दौऱ्याचे वेळापत्रक देखील प्रशासनाकडे आले होते. मात्र, अचानक शिंदे यांनी दौरा रद्द करत दरे गावी राहणेच पसंत केले.