एसटी कर्मचाऱ्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, लवकरच तोडगा काढू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येईल, असेही राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे

मुंबई – लालपरी अर्थात एसटी ही आजही गाव-खेड्यातील आणि ग्रामीण भागातील लोकांच्या प्रवासाचे मुख्य साधन समजले जाते. एसटी ही तोट्यात आहे… डबघाईत आहे अशी ओरड नेहमी ऐकायला मिळते. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या यावर नेहमी चर्चा होते. तसेच त्यांच्या पगारावरूनही अनेकवेळा एसटी कामगार संघटना आवाज उठवताना दिसतात. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा मागील महिन्याचा केवळ 56% पगार आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यातून संतापाची लाट उसळत असून, 100% पूर्ण पगार जर नाही दिला तर आपण संपाचे अस्त्र उगारू, असा इशारा एसटी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी संघटनानी दिला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही…

एसटी कर्मचाऱ्यांनी आपला पूर्ण पगार जर पुढील दहा दिवसात नाही मिळाला तर आपण अर्थमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू आणि संप पुकारू, असा इशारा दिला आहे. असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता, एसटी कर्मचाऱ्यांचा कमी पगार मिळाला आहे, हे जरी खरं असले तरी त्यासाठी एक हजार कोटीचा लवकरच राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला निधी देण्यात येईल. आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर लवकर तोडगा काढून पगार 100% दिला जाईल. एसटी कर्मचाऱ्यावर संप पुकारण्याची किंवा आंदोलनाची वेळ राज्य सरकार येऊ देणार नाही. असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. आज त्यांनी पुण्यात महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वाड्याला भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

पुढील मंगळवारी पगार होणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवरून राज्यभर संतापाची लाट उसळत आहे. तर कर्मचाऱ्यातून उद्रेक होण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून पंधराशे रुपये महिलांना देत आहे. अनेक फुकट योजनातून निधीचे वाटप करत आहे. परंतु जे एसटीचे कर्मचारी लोकांची सेवा करतात. त्यांना पगार द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल एसटी कर्मचाऱ्याकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा रोष पाहता लवकरच सरकार योग्य तो निर्णय घेईल. आणि पुढील मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येईल, असेही राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News