मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वाढणारी वाहतूक आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक बाह्यवळण रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. या रस्त्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, तसेच भाविकांना दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यासाठी ई-बस एकात्मिक सेवा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांना योग्य सुविधा देण्यासाठी परिक्रमा मार्ग, विमानतळ-संपर्क रस्ते, समृद्धी महामार्ग जोडणी, रुंदीकरण आणि वाहतूक नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. तसेच, नाशिक विभागीय आयुक्त आणि पालक सचिवांनी प्राधान्यक्रम निश्चित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 10 दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

भू-संपादनाची आवश्यकता
शहरी आव्हान निधीअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शनात नाशिकच्या वाहतूक प्रकल्पांचा समावेश करण्याचे आदेश देण्यात आले. प्रस्तावित 137 किमी ग्रीनफिल्ड बाह्यवळण रस्त्यांपैकी काही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तर उर्वरित महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारले जाणार आहेत. यासाठी 500 हेक्टर भू-संपादनाची आवश्यकता असून ते 40 गावांमध्ये होणार आहे.
वाहनतळ निर्माण करण्याचे निर्देश
मुंबई, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, पुणे, धुळे आदी भागांतून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी या रस्त्यांवर वाहनतळांची व्यवस्था, शहरातील रस्त्यांचे नियोजन, व कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वय साधण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले. या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.