वडाळा : विश्व हिंदू परिषदेकडून रामनवमी निमित्त मुंबईतील वडाळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला पोलिसांनी परवानगी न दिल्याने तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी रॅली काढताच पोलिसांनी लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून पोलिस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसमाने आले.
विहिंपच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं की, आम्ही शांततेत घोषणा देत होतो. पोलिसांनी आम्हाला प्रवेश देण्यास सांगितलं आणि मग अचानक लाठीचार्ज का केला. या पोलिसांच्या अॅक्शनमुळे परिसरात मोठा तणाव होता. घटनास्थळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमधील चर्चेनंतर अखेर रॅलीला परवानगी देण्यात आली.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी रॅलीला परवानगी नाकारली होती. तरी देखील रॅली काढण्यात आली. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी लाठीचार्च केल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, काही तरुणांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी गेली. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. अखेर चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली.
मंत्री लोढांनी दिली भेट
घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या ठिकाणी भेट देत संवाद साधला. मात्र, ते माध्यमांशी बोलले नसल्याची माहिती आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.