मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने अनेक महत्त्वकांक्षी योजना आणल्या होत्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे. यानंतर महायुतीने अनेक योजनांची घोषणा केली होती. यात मुख्यमंत्री तीर्थस्थळ दर्शन योजनेचाही सहभाग होता. मात्र या योजनेत मागील सहा महिन्यापासून केलेल्या अर्जाला काही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सरकार आणखी एक योजना गुंडाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
योजनांची खैरात पण…
महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेमुळे पुन्हा महायुतीला सत्ता मिळाल्याचे बोललं जातं आहे. या योजनेला राज्यात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, याच काळात कौशल्य योजना, लेक लाडकी योजना, महिलांना प्रवासात 50 टक्के सवलत आदी योजना महायुतीने आणल्या होत्या. यावेळी जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थस्थळ योजना सुद्धा आणली होती. मात्र अनेकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक ऑक्टोबर 2024 आणि त्याच्याही आधी अर्ज केले. परंतु या अर्जाला चेंबूरच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातून कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा भ्रमनिरास झाला असून, सरकारने फक्त मतांसाठी या योजनांची घोषणा केली होती का? असं संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

आणखी एक योजना गुंडाळी जाणार?
दुसरीकडे आनंदाचा शिधा ही योजना सरकारने गुंडाळली आहे. याचबरोबर एक रुपयात कृषी पिक विमा ही योजना देखील सरकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सरकारने निवडणुकीपूर्वी 2100 रुपये देण्याचे घोषणा केली होती. मात्र अद्यापपर्यंत 2100 रुपये मिळाले नाहीत. अनेक योजनांची खैरात केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे. एकट्या लाडक्या बहिण योजनेत 46,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक घडी बसवताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अनेक योजना सरकार बंद करण्याच्या तयारीत असताना, आता जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थस्थळ दर्शन योजना सरकार गुंडाळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.