नारायण राणेंच्या टीकेनंतर रावसाहेब दानवेंचा मोठा दावा, “उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही”

रावसाहेब दानवेंच्या दाव्याने मोठी खळबळ

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेनेतून 2022 साली शिवसेनेतून बंड केले. या बंडानंतर शिवसेना (ठाकरे गटाला) लागलेली गळती अद्यापर्यंत थांबायचं नाव घेत नाही. त्यातच विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही.

राज्याच्या राजकारणात अनेक मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात. रविवारी भाजपाच्या वर्धापन दिनी शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर खोचक टीका केली होती. भाजपाच्या वर्धापन दिन तारखेनुसार…, तिथीनुसार…, की सोयीनुसार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपाला डिवचले होते.

यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष राहणार नाही, असं भाकित नारायण राणे यांनी केलं होतं. यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मोठा दावा केला आहे.

रावसाहेब दानवे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

दरम्यान, ६ एप्रिल (रविवारी) रोजी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त देशासह राज्यभर विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. पक्षाची संघटनात्मक बांधणी हा ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम जालना जिल्ह्यात घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे गटाबाबत एक मोठा दावाही केला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत शिल्लक राहणार नाही. असं मोठं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येते. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

…म्हणून लोकं दूर गेलेत

यावेळी पुढे बोलताना रावसाहेब दानवेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसवरही टीका केली. एकेकाळी जालना जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार होते. मी एकटाच जिल्ह्यात आमदार होतो. आज भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत. शिवसेनेचे दोन आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे मोठी ताकद होती. पण त्यांच्या व्यवहारामुळे त्यांच्या वागण्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या विचारापासून दूर गेले. तर उबाठा गट पुढील निवडणुकीपर्यंत शिल्लक राहणार नाही… असा दावाही दानवे यांनी केला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News