Mumbai Palika – मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या पावसाचा परिणाम सर्वंत्र दिसून आला. मुंबईत पहिल्या पावसावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, आरोप प्रत्यारोप होताना दिसताहेत. तर दुसरीकडे सखल भागातील पाणी उपसा करण्यासाठी पालिका प्रशासनाने केलेल्या पावसाळी नियोजनात लघु उदंचन केंद्र परिचालकांनी निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा उभी केली नाही. तसेच पुरेशा क्षमतेने कार्यान्वित केली नाही. यावरुन पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोणत्या विभागातील लघु उदंचन केंद्र?
दरम्यान, लघु उदंचन केंद्र परिचालकांनी अटी व शर्तीप्रमाणे यंत्रणा उभी केली नाही. आणि पुरेशा क्षमतेने तिचा वापर केला नाही. म्हणून या कारणामुळं पालिका प्रशासनाने त्यांना प्रत्येकी १० लाख रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येलो गेट, हिंदमाता, गांधी मार्केट, आणि चुनाभट्टी येथील लघु उदंचन केंद्र परिचालकांकडून प्रत्येकी १० लाख रूपये म्हणजेच एकूण ४० लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. असं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

मुंबईत विक्रमी पावसाची नोंद…
मुंबई महानगरात काल सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी मे महिन्यातील विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या १३ तासांमध्ये २५० मिलीमीटर पावसाची नोंद अनेक ठिकाणी झाली. पावसाळी पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा यासाठी पालिकेने विविध ठिकाणी १० ठिकाणी लघू उदंचन केंद्र उभारली आहेत. या केंद्रांचे परिचालन कंत्राटदारामार्फत केले जाते. त्यासाठी निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी व शर्ती देखील ठरवून देण्यात आल्या आहेत. पण हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथे अतिसखल भागात जोरदार पावसाने पाणी साचल्याचे निदर्शनास आले. लघू उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने व वेळेत कार्यान्वित झाली नाही, म्हणून दंड ठोठवण्यात आला आहे.