आपण रोजच्या वापराला सोन्याचे लहान मंगळसूत्र, कानातले असे काही ना काही दागिने आवर्जून वापरतो. इतकेच नाही तर चांदीची जोडवी, पैंजण, ब्रेसलेट असेही वापरतो. रोजच्या रोज या वस्तू वापरुन त्या काहीशा काळ्या पडायला लागतात. सतत येणारा घाम, प्रदूषण, धूळ यांच्याशी संपर्क आल्याने या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पॉलिश जाते आणि त्याची चकाकी कमी होते.
चांदींच्या काळ्या पडलेल्या वस्तू पुन्हा चमकवण्यासाठी आपण बऱ्याचदा सोनाराकडे जातो. यामुळे त्या पुन्हा चमकू लागतात. मात्र कालांतराने त्या पुन्हा काळ्या होतातच. यामुळे प्रत्येकवेळी सोनाराकडे जाणं शक्य नसतं. शिवाय खर्च देखील होतो. यासाठी आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी चांदीच्या वस्तूंचा काळपटपणा दूर करू शकता. यामुळे तुमच्या चांदीच्या मूर्ती किंवा दागिने पुन्हा नव्या सारख्या चमकू लागतील..

पाणी आणि बेकिंग सोडा
चांदीचे दागिने साफ करण्यासाठी आणि चमकदार होण्यासाठी हा उपाय खूप फायद्याचा आहे. हा उपाय करताना अगोदर बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून घ्यावा व त्यानंतर त्याची पेस्ट बनवावी व ती दागिन्यांवर लावून 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्यावेत. थोड्यावेळाने कोमट पाण्याने दागिने धुऊन टाकावेत. अशा पद्धतीने तुम्ही काळे पडलेले चांदीचे दागिने पुन्हा चमकदार करू शकतात.
लिंबू आणि मीठ
काळे पडलेले चांदीचे दागिने चमकदार करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि मिठाचा वापर करू शकता. या उपायामध्ये तुम्हाला एका भांड्यात मीठ घ्यावे लागेल व त्यात लिंबाचा रस पिळून चांगले मिसळून घ्यावे. त्यानंतर मीठ व लिंबाची पेस्ट बनवून ती दागिन्यांवर लावावी व दहा पंधरा मिनिटे दागिने तसेच राहू द्यावेत.. त्यानंतर ते दागिने कोमट पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसून घ्यावेत. अशा पद्धतीने चांदी पुन्हा चमकदार होते.
टूथपेस्ट
दागिने स्वच्छ करण्यााठी पाणी आणि टूथपेस्टचा वापर करा. एखादा जुना टूथब्रश घ्या आणि त्यावर टूथपेस्ट घ्या आणि दागिने चांगले घासा. यामुळे दागिन्यांमध्ये असलेली घाण आणि काळपटपणा काढून टाकायला मदत होईल आणि दागिने पुन्हा चमकण्यास मदत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एमपी मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एमपी मराठी कोणताही दावा करत नाही.)