उन्हाळ्याच्या सुट्ट्या येणार आहेत. अशा परिस्थितीत बहुतेक लोक फिरायचे नियोजन करू लागतात. या काळात बहुतेक लोक कुटुंबासह सहलीचे नियोजन करतात. बरेच लोक तर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतील. अशावेळी सगळ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असते ते नाव म्हणजे ‘कोकण’. काही लोकांचं आजोळ, तर काहींच्या मामाचं गावं… कोकणात फिरण्यासाठी मुळात कुठल्याही कारणाची गरज भासत नाही. पण, बऱ्याचदा कोकणातील पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं, असे अनेक प्रश्नही पडतात. कोकण त्याच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारा सोडून कोकणात अनेक पर्यटन स्थळे आहेत. कोकणात फिरायला जाणे म्हणजे एक आगळी- वेगळी पर्वणीच असते. जर तुम्हीही कोकणात फिरायला येण्याचा विचार करताय? तर या ठिकाणांना आवर्जून भेट द्या..
तारकर्ली
कोकणात आल्यानंतर सर्वात जास्त ओढ लागते ती समुद्रकिनाऱ्यांची! त्यातही कोकणामध्ये आता तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. याचे कारण म्हणजे, या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीही सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत. या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनचे दर्शनही होते. खास डॉल्फिन बघण्यासाठीही अनेक जण कोकण सहल काढताना तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्याला मुद्दाम भेट देतात. तारकर्ली समुद्रकिनारा त्याच्या निर्मळ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा समुद्रकिनारा मालवणपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे.

आरे वारे समुद्रकिनारा
रत्नागिरीच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असणारा ‘आरे वारे बीच’ हा अतिशय स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे मनाला मिळणारी शांतता आणि स्वच्छपणा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. दोन्ही बाजूला डोंगर आणि मधोमध समुद्र, असा मनमोहक निसर्गाचा नजारा इथे पाहायला मिळतो. आरे वारेच्या समुद्रकिनाऱ्याला आता बरेच पर्यटक भेट देऊ लागले आहेत.
कशेळी,कनकादित्य मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यात एक कशेळी नावाचे गाव स्थित आहे. या गावात प्रसिद्ध असे कनकादित्य मंदिर आहे. आपल्या भारतात सूर्याची फक्त सात मंदिरे आहेत. त्यापैकी एक असलेले मंदिर हे कशेळी गावातील कनकादित्य. जगभरात या मंदिरला पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. या मंदिरात पोहचण्यासाठी तुम्हाला रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून रिक्षा असतात.
मालवण
कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे मालवण, कडक उन्हापासून सुटका करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मालवणला जा. महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण मन मोहित करणाऱ्या समुद्रकिनाऱ्यासाठी लोकप्रिय आहे. इतर बीचच्या तुलनेत याठिकाणी लोकांची जास्त गर्दी नसल्यामुळे तुम्हाला शांततापूर्ण वातावरणाचा अनुभव घेता येतो. मालवण बीचवर नारळी, पोफळीच्या बागा, बांबू, सुपारीची झाडे पहायला मिळतात.
गणपतीपुळे
गणपतीपुळे हे मंदिर 400 वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिराला स्वयंभू गणपती मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर 1600 वर्षांपूर्वी सापडले होते.
हरिहरेश्वर (रायगड)
हरिहरेश्वर हे ठिकाण तिथे असलेल्या परशुराम मंदिर, शांत समुद्रकिनारा आणि ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे ठिकाण हरिहरेश्वर, हर्षिनाचल आणि पुष्पाद्री या तीन टेकड्यांनी वेढलेले आहे.
रत्नदुर्ग किल्ला
रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटरवर असणारा ‘रत्नदुर्ग’ किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इथे असलेलं भगवती देवी मंदिर प्रसिद्ध आहे. इथे एक भुयारी मार्गदेखील आहे. इथे येणारे पर्यटक इथल्या विहंगम दृष्यामुळे मोहून जातात. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)