मुंबई : उन्हाच्या झळा वाढू लागल्यानं अंगाची लाहीलाही होऊ लागलीय. मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांत घराबाहेर पडणाऱ्यांच्या अंगाची काहिली होताना पाहायला मिळतेय. वाढत्या तापमानाचा परिणाम तब्येतीवर होण्याची शक्यता आहे. डी हायड्रेशनची समस्या या काळात डोकं वरं काढते. त्यामुळे सतत पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत.
डोळ्यांची निगा राखा
यातच उन्हाचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय तो डोळ्यांवर. शरीराचा अत्यंत संवेदनशील भाग असलेल्या डोळ्यांची उन्हाळ्याच्या दिवसांत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनेक जणं उन्हात बाहेर पडताना गॉगल्सचाही वापर करतायेत. मात्र तरीही डोळ्यांची आग आग होणे, डोळ्यांतून पाणी येणे असे प्रकार उन्हाळ्यात सातत्यानं पाहायला मिळतात. त्यामुळेच उन्हाळ्यात डोळ्यांची निगा अधिक तत्परतेनं राखण्याची गरज आहे.

काही व्हिटॅमिन आणि मिनरल्स तुमच्या डोळ्यांची उन्हाळ्यात काळजी करु शकतात, कोणते आहेत हे व्हिटॅमिन्स?
1. व्हिटॅमिन ए
डोळ्यांची निगा राखण्यासाठी व्हिटॅमिन ए हे अत्यंत महत्त्वाचे काम करते. रेटिनाची क्षमता चांगली राखण्यासाठी याची मदत होते. रात्रीच्या वेळी दृष्टीच्या क्षमतेवरही व्हिटॅमिन एचा चांगला परिणाम होतो. गाजर, पपई, आंबा, पालक, दूध आणि अंड्यांचा आहारात समावेश असल्यास व्हिटॅमिन एचा आहारात समावेश होतो
2. व्हिटॅमिन सी
उन्हाळ्याच्या काळात धूळ आणि प्रदुषणामुळे डोळ्यांची आग होणे किंवा डोळे लाल होण्यासारख्या समस्या वाढतात. अशा स्थितीत व्हिटॅमिन सी हे अँटी ऑक्सिडंटच्या रुपात काम करते. व्हिटॅमिन सीमुळे डोळ्यांचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. लिंबू, आवळा, संत्रे, टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा आहार हे व्हिटॅमिन सीचे चांगले स्रोत आहेत.
3. व्हिटॅमिन ई
वाढत्या वयानुसार डोळ्यांमध्ये कमकुवतपणा वाढतो. दृष्टी अधू होण्याचे प्रकारही सामान्य आहेत. वाढत्या वयात मोतिबिंदूसारख्या समस्यांवर व्हिटॅमिन ई उपयोगी ठरते. यासाठी आहारात बदाम, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
4. ओमेगा-3 फॅटी ऍसिड
उन्हाळ्याच्या काळात डोळे ड्राय होणं ही समस्या नवी नाही. ओमेगा-3 फॅटी ऍसिडच्या सहाय्यानं डोळ्यांत ओलेपणा राखण्यात मदत होते. अळशीच्या बिया, चिया सीड्स आणि मासे सेवन केल्याने ओमेगा-3 फॅटी अॅसिड मिळू शकते.
5. झिंक
झिंक हे असे एक मिनरल आहे की जे व्हिटॅमिन एला रेटिनापर्यंत पोहण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांच्या प्रकाश स्रोतांवर त्याचा परिणाम होतो. यासाठी हरबरे, तीळ, अंडी आणि दूधाचा डाएटमध्ये समावेश असणे गरजेचे आहे.