महापालिका, नगरपालिका, झेडपी निवडणुका तीन टप्प्यांत, ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची तयारी

बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थाच्या हालचाली राज्यात सुरु झाल्या आहेत. मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या या निवडणुका पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनीही आता या प्रचाराची तयारी सुरु केलीय.

मुंबई- विधानसभा निवडणुकांनंतर मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या राज्यातील महापालिका, नगरपालिका, झेडपींच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत पार पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं निवडणुकांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता या निवडणुकांबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

गणेशोत्सव आणि पावसाळा संपल्यानंतर दिवाळीच्या तोंडावर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. महायुती विरुद्ध मविआ असा संघर्ष आणि त्यासोबतच नवी राजकीय समीकरणंही या निवडणुकीत बघायला मिळतील, असं दिसतंय. मुंबई महापालिकेसाठी 9 जूनपासूनच भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना रणशिंग फुंकणार असं दिसतंय. दोन्ही पक्षांचे मेळावे एकाच दिवशी मुंबईत पार पडणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाची जुळवाजुळव

सुप्रीम कोर्टानं सहा मे रोजी निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं याबाबतची तयारी सुरु केल्याची माहिती आहे. प्रशासकीय आणि राजकीय नियोजनानुसार तीन टप्प्यांत या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे.

प्रभाग रचनेच्या हालचालींनाही वेग आल्याचं सांगण्यात येतंय. मुंबई महापालिका वगळता इतर सर्व महापालिकांत 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगानं महापालिका आणि झेडपींना पत्र पाठवलं असून, येत्या 40 दिवसांत जून अखेरपर्यंत प्रभाग, गण, गटाची रचना करण्याचे निर्देश दिलेत.

प्रभाग रचनेसाठी लागणार दोन महिने

2021 च्या जनगणनेुसार प्रभाग रचना होईल. काही प्रभागांच्या रचनेतही बदल होण्याची चिन्हं आहेत. याला न्यायालयात आव्हान दिलं जाण्याचीही शक्यता आहे. हे सर्व लक्षात घेता दोन महिने प्रभाग रचना अस्तित्वात येण्यासाठी लागतील.

तीन टप्प्यांत निवडणुका

यापूर्वी झालेल्या निवडणुका या एकाच टप्प्यात होतात, मात्र भाजपा आणि महायुतीची निवडणुकीची रणनिती पाहता तीन टप्प्यांत निवडणुका होण्याचे संकेत आहेत. प्रचाराची संधी मिळाली आणि एका टप्प्यात एका भागाकडे लक्ष देता यावे यासाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

1. पहिल्या टप्प्यात उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्रात मतदान होईल.

2. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

3. तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि कोकणात मतदान होण्याची शक्यता आहे.

किती महापालिका, झेडपींच्या निवडणुका?

राज्यात 29 महापालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषदा आणि 288 पंचायत समित्यांसाठी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News