मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कर्नाक उड्डाण पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार, येत्या चार दिवसात काम पूर्ण होणार

मध्‍य रेल्‍वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार कर्नाक पुलाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. सद्यस्थितीत आर.सी.सी. डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या ह‌द्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत.

Karnak flyover –  मुबंईकरांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका ह‌द्दीतील पोहोच रस्‍त्‍याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या चार दिवसात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असं पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

रंगरंगोटीच्या कामांना वेग…

दरम्यान, १२५ वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्‍याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये पुलाचे निष्‍कासन केले. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी (Lane Marking), पथदिवे (Street light), रंगरंगोटी (Painting), दिशादर्शक फलक (Signboard) उभारणी कामे प्रगतिपथावर असून ती येत्या चार दिवसात पूर्ण होत आहेत. सद्यस्थितीत कर्नाक रेल्‍वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्‍याकामी सज्‍ज आहे. या पुलाची पाहणी काल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी केली.

पुलाचे काम बांधकाम…

लोहमार्गावरील पुलाच्‍या उभारणीकामी आरसीसी आधारस्तंभ यावर (Pier) प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्‍या दोन तुळया स्‍थापित करण्‍यात आल्‍या आहेत. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४ रोजी आणि उत्‍तर बाजूची लोखंडी तुळई दिनांक २६ आणि ३० जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍यात आली आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले.


About Author

Astha Sutar

Other Latest News