पहलगाममधून अमरनाथ यात्रा कुठून सुरू होते? दहशतवादी हल्ल्याचे ठिकाण किती अंतरावर? पाहा

Amarnath Yatra Route Point From Pahalgam : २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला होता. या घटनेला आता एक महिना झाला आहे, पण त्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. जगभरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. देशभरात अजूनही संतापाचे वातावरण आहे. या घटनेचे दु:ख कदाचित कधीच विसरता येणार नाही. मात्र या दरम्यान, चर्चा झोतात आलेल्या पहलगामचे एक वेगळे रूप समोर येते, हेच ते ठिकाण आहे जिथून बाबा बर्फानी यांची अमरनाथ यात्रा सुरू होते.

अमरनाथ यात्रा कधीपासून सुरू होत आहे?

यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होत आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात सुरू होणारी ही यात्रा पौर्णिमेच्या दिवशी संपते. हिमाच्छादित शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आधीपासून ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नोंदणी करत आहेत. ही यात्रा ३ जुलैपासून सुरू होऊन ९ ऑगस्टला संपेल. बाबा बर्फानींची पवित्र अमरनाथ गुंफा समुद्रसपाटीपासून सुमारे १३,००० फूट उंचीवर आहे.

हल्ला झालेल्या ठिकाणापासून यात्रा सुरू होणारे स्थान किती दूर?

अमरनाथ गुंफकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग दक्षिण काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू होतो, आणि दुसरा मार्ग अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथून, जिथे अलीकडे दहशतवादी हल्ला झाला होता. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलेली जागा म्हणजे बैसरन व्हॅली. या ठिकाणापासून नुनवान बेस कॅम्प सुमारे ७–८ किलोमीटर अंतरावर आहे, जिथून अमरनाथ यात्रा सुरू होते.

पहलगामहून अमरनाथ गुंफेपर्यंतचा संपूर्ण रस्ता सुमारे ४७.३ ते ४८ किलोमीटर आहे. पहलगामपासून १६ किमीवर चंदनवाडी येते — हा यात्रेचा पहिला टप्पा आहे. इथून पुढे खरी चढाई सुरू होते.

अमरनाथ यात्रेचा रूट

चंदनवाडीनंतर पुढील मार्ग असा आहे:

  • पिस्सू टॉप
  • जोझीबल
  • नागकोटी
  • शेषनाग
  • वारबल
  • महागुनस टॉप
  • पाबीबल
  • पंचतरणी
  • आणि शेवटी संगम पॉइंट

संगमपासून अमरनाथ गुंफेचे अंतर फक्त ३ किलोमीटर असते. भाविक अनेक ठिकाणी थांबत, विश्रांती घेत ही यात्रा पार करतात. ही संपूर्ण यात्रा पूर्ण करायला ३ ते ५ दिवस लागतात.

दुसरा मार्ग बालटाल येथून सुरू होतो. त्याचे फक्त तीन टप्पे आहेत.

  • डोमाली
  • बरारी
  • संगम

हा रस्ता फक्त १४ किलोमीटर आहे आणि तुलनेने थोडा कठीण पण लवकर पार होणारा आहे.

 


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News