मुंबई : सध्या उन्हाचा कडाका आहे, वातावरणातील तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत असताना आता राज्यातील काही भागात उष्णतेचा लाटेचा अलर्ट तर काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेची भीती…
दरम्यान, सध्या एप्रिल महिना सुरू आहे तर साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात मान्सून दाखल होतो. मान्सूनला अजून दोन महिने बाकी असताना काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठमुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. तर आता राज्यातील काही भागात उष्णतेचा लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दक्षिणेकडून सायक्लोनिक सर्क्युलेशनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राजस्थान आणि गुजरात हे देशातील सर्वात उष्ण राज्य म्हणून गेल्या दोन दिवसात नोंद झाली आहे. गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याला या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना?
एकीकडे राज्यात उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याकडून इशारा देण्यात आल्यानंतर विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे कपाशी, सोयाबीन आणि हरभरा तसेच अन्य पिकांचे नुकसान होण्याती भीती शेतकऱ्यांना आहे. आधीच दुष्काळी आणि अस्मानी संकटामुळे बळीराजा आर्थिक संकटात असताना आता या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.