मुंबईच्या दादरमध्ये 15 एप्रिलनंतर भयंकर वाहतूक कोंडी? नेमकं कारण काय?

वरळी - शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवी स्थानकातील पूल पाडला जाणार आहे. केईएम, वाडिया रूग्णालय गाठताना यामुळे दमछाक होणार आहे. परिणामी 15 एप्रिलनंतर दादर भागात मोठी वाहतूक कोंडी उद्भवण्याची शक्यता आहे.

दादर, मुंबई: वरळी – शिवडी उन्नत मार्गिकेचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे. यासाठी प्रभादेवी स्थानकातील असणारा पूल पाडला जाणार आहे. परिणामी 15 एप्रिलनंतर दादर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दादरमध्ये वाहतूक कोंडी होणार?

प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल बंद केल्यावर सायन, माटुंग्यावरून येणारी आणि वरळी, लोअर परळ, महालक्ष्मीकडे जाणारी वाहतूक दादरच्या टीळक पुलावरून वळविली जाणार आहे. त्यामुळे दादर पश्चिमेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत. अटल सेतूची थेट वांद्रे – वरळी सी लिंकला जोड देण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वरळी – शिवडी उन्नत मार्गिकेसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यामूळे पाडकामासाठी हा पूल बंद करण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडून मिळण्याची शक्यता आहे.

प्रभादेवी रेल्वे पूल वाहतूकीसाठी बंद केल्यानंतर दादर भागात मोठी वाहतूक कोंडी होईल. प्लाझा ते कबुतरखाना अंतर पार करताना वाहनचालकांच्या नाकी नऊ येतील, त्यामुळे या भागातील कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना पोलिसांना हटवावे लागेल. त्यासाठी पुढील दीड वर्ष वाहतूक पोलीस , पालिका आणि स्थानिक पोलिसांचे पथक प्रत्येक चौकात तैनात ठेवावे लागेल

 

नवा पूल उभारून जुना तोडण्याची मागणी

प्रभादेवीची पूल बंद झाल्यानंतर नागरिकांना दादर स्टेशनच्या टीळक पूलाचा किंवा पुढे करी रोड पुलाचा वापर करावा लागणार आहे. स्टेशनच्या पूर्वेकडील केईएम, वाडीया, टाटा या हॉस्पिटलला जाणाऱ्या रूग्ण आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल होतील, असं बोललं जातं आहे. तसेच या परिसरात नोकरदार आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्य़ांची मोठी वर्दळ असते त्यांनाही मनस्ताप होवू शकतो. त्यामुळे आधी नवा पूल उभारावा, आणि त्यानंतर जूना तोडावा अशी मागणी
नागरिकांकडून केली जात आहे.

पूल बंद केल्यानंतर त्याच्या होणाऱ्या परिणामांचा आधी विचार करावा, आणि मग पुल तोडावा अशी मागणी वाहतूक तज्ज्ञांकडून केली जात आहे. त्यानंतर वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर समिती नेमून तिच्या सूचनेनुसार उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News