चिया सीड्समुळे लिव्हर डिटॉक्स होतो का? या गोष्टीत कितपत तथ्य? जाणून घ्या

आजकाल चिया सीड्स सर्वत्र पाहायला मिळतात. स्मूदीमध्ये, सलाडमध्ये किंवा हेल्दी डेसर्टमध्ये. सोशल मीडियावर त्यांचा प्रचार एक ‘सुपरफूड’ म्हणून केला जातो. चिया सीडबाबत सर्वात मोठा दावा म्हणजे, ते लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करतात, विशेषतः जर एखाद्याला फॅटी लिवरची समस्या असेल. पण खरोखरच एक चमचा चिया सीड्स लिव्हर साफ करू शकते का

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये (लिव्हर) अतिरिक्त चरबीचा साठा होणे. वैद्यकीय भाषेत याला हेपेटिक स्टेटोसिस म्हणतात. यात दोन प्रकार असतात:

• अल्कोहोलिक फॅटी लिव्हर : अतिप्रमाणात दारू पिण्यामुळे होतो.
• नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर (NAFLD): खराब आहार व कमी शारीरिक हालचालीमुळे होतो.
प्रारंभी लक्षणे जाणवत नाहीत, पण पुढे जाऊन थकवा, यकृत सूज आणि सिरोसिससारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो.

डॉक्टर काय सांगतात?

फॅटी लिव्हर सुधारण्यासाठी डॉक्टर मुख्यतः लाइफस्टाइल बदलण्याचा सल्ला देतात:
• वजन कमी करणे
• नियमित व्यायाम
• साखर व फास्ट फूड टाळणे
• आरोग्यदायी आहार घेणे

चिया सीड्स लिव्हरसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात?

चिया सीड्स हे लहान असले तरी पौष्टिक तत्वांनी भरलेले असतात:

• फायबर: रक्तातील साखरेचे प्रमाण व इन्सुलिन लेव्हल नियंत्रणात ठेवतो.

• ओमेगा-3 फॅटी अॅसिड (ALA): लिवरमधील सूज व अतिरिक्त चरबी कमी करतो.

• अँटीऑक्सिडंट्स: लिवर पेशींचे नुकसान कमी करून गंभीर आजारांपासून बचाव करतात.

शास्त्रीय अभ्यास काय सांगतो?

2014 मध्ये उंदरांवर झालेल्या एका अभ्यासात हाय फॅट डायट देण्यात आलेल्या उंदरांना चिया सीड्स दिले असता त्यांच्या लिवरमधील चरबी कमी झाल्याचे दिसले. काही मानवी अभ्यासांतही हे दिसले की चिया सीड्समुळे पोटाची चरबी, ट्रायग्लिसराईड्स व इन्सुलिन रेसिस्टन्स कमी झाला.

मात्र, अद्याप असा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही की फक्त चिया सीड्स खाल्याने फॅटी लिवर पूर्णपणे बरा होतो. त्याचा परिणाम मुख्यतः वजन कमी होणे, सूज कमी होणे व चयापचय सुधारण्याच्या मार्गाने होतो.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News