मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विडंबनपर गाण्यात गद्दार या उल्लेखानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत कामराचा कार्यक्रम झाला त्या हॉटेल आणि कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. कामराच्या विरोधात मुंबईत खारसह राज्यभरात अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुणाल कामरा यानं माफी मागावी अशी मागणी करण्यात आलीय.
मात्र कामरा त्याच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसतंय. या प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंततर कामरा महाराष्ट्राच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येतंय. खार पोलिसांनी कामरानं पोलिसांसमोर उपस्थित राहून त्याची बाजू मांडावी, यासाठी आत्तापर्यंत तीन समन्स कामराला बजावले आहेत. मात्र कामरा अद्यापही मुंबई पोलिसांसमोर हजर झालेला नाही. आता कुणाल कामरानं या प्रकरणात नवं पाऊल उचललंय.

कामराची हायकोर्टात याचिका
एकनाथ शिंदे अवमान प्रकरणात कुणाल कामराविरोधात दाखल करण्यात आलेला एफआयर रद्द करावा, अशी मागणी कामरानं याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात केली आहे. गद्दार प्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर हा देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचा दावा कामराच्या वतीनं या याचिकेत करण्यात आलाय. दाखल करण्यात आलेली एफआयआर ही घटनेनं दिलेल्या मूलभूत अधिकाराचा भंग करणारी असल्याचंही कामराच्या वतीनं सांगण्यात आलंय.
21 एप्रिल रोजी होणार सुनावणी
कुणाल कामरा याच्या या याचिकेवर मुंबई हायकोर्टात 21 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून कामरा पोलिसांसमोर उपस्थित झालेला नाही. माफी मागणार नाही, असा पवित्रा घेतलेल्या कामरानं न्याय यंत्रणेला सहकार्य करणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. मद्रास हायकोर्टातून कामरानं या प्रकरणात 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीनही मिळवलेला आहे. आता कामराला मुंबई हायकोर्टातून दिलासा मिळणार का हे पाहावं लागणार आहे.