“नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन…”; गायक सलील कुलकर्णींचे ट्रोलर्सना कवीतेतून उत्तर

कवितेमधून सलील कुलकर्णींनी ट्रोलर्सला सुनावलं, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अलिकडे सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम समजलं जातं. या माध्यमाद्वारे जगभरातील माहिती मिळते. शिवाय जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधता येतो. सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंग प्रचंड वाढल आहे. विशेष करून कलाकारांना जास्त प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कलाकार म्हटलं की, त्यांना कौतुकाप्रमाणेच ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. प्रत्येक कलाकार हा यशाच्या शिखरावर जात असताना त्याला ह्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. कौतुक आणि ट्रोलिंग करण्याचं उत्तम माध्यम म्हणजे, सोशल मीडिया. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना हे फेक युजर्स कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ट्रोल करतच असतात. पण या क्षणभर ट्रोलिंगचा त्यांच्यावर काय परिणाम होत असेल याचा विचार कधी कोणी केलाय?

अशातच या प्रकरणावर गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ट्रोलर्ससाठी खास एक कविता लिहिली आहे, जी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. 

‘नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो’ ही कविता सलील कुलकर्णीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेक मराठी कलाकारांनी या कवितेला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हंटलय एक निरीक्षण… अशा निनावी , आणि चेहरे नसलेल्या माणसांचं.. कुठून येतात ही माणसं? कुठून येते ही वृत्ती? कोणाविषयीच आदर न वाटणारी .. ते एखादंच वाईट वाक्य बोलतात .. पण जो ऐकत असतो ,त्याने ऐकलेलं त्या दिवसातले १०० वे वाईट वाक्य असेल आणि त्याचा तोल ढळला तर? तो जगण्यावर रुसला तर ? अशी भीती सुद्धा वाटत नाही ह्यांना? या वृत्तीच्या माणसांच्या मनातल्या अंधारात डोकावून पाहायचा प्रयत्न करतांना ही कविता सुचली..

काय आहे सलील कुलकर्णी यांची कविता?

नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
रोज वेगळं नाव लावून लपून लपून भुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे

याच्यासाठी काही म्हणजे काही सुद्धा लागत नाही
कोणी इथं तुमच्याकडे डिग्री वगैरे मागत नाही
ज्ञान नको, विषयाची जाण नको
आपण नक्की कोण, कुठले; ह्याचे सुद्धा भान नको
खूप सारी जळजळ हवी
विचारांची मळमळ हवी
दिशाहीन त्वेष हवा
विनाकारण द्वेष हवा
चालव बोटे धारदार
शब्दांमधून डंख मार
घेरून घेरून एखाद्याला
वेडा करून टाकीन म्हणतो…
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे…

खाटेवरती पडल्या पडल्या
जगभर चिखल उडव
ज्याला वाटेल, जसं वाटेल
धरून धरून खुशाल बडव
आपल्यासारखे आहेत खूप
खोटी नावे, फसवे रूप
जेव्हा कोणी दुबळे दिसेल
अडचणीत कोणी असेल
धावून धावून जाऊ सारे
चावून चावून खाऊ सारे
जोपर्यंत तुटन नाही
धीर त्याचा सुटत नाही
सगळे मिळून टोचत राहू
त्याच्या डोळ्यात बोचत राहू
धाय मोकलून रडेल तो
चक्कर येऊन पडेल तो
तेवढ्यात दुसरं कोणी दिसेल
ज्याच्या सोबत कोणी नसेल
आता त्याचा ताबा घेऊ
त्याच्यावरती राज्य देऊ
मग घेऊन नवीन नाव
नवा फोटो, नवीन डाव
त्याच शिव्या, तेच शाप
त्याच शिड्या, तेच साप
वय, मान, आदर, श्रद्धा
सगळं खोल गाडीन म्हणतो
जरा कोणी उडलं उंच
त्याला खाली पाडीन म्हणतो
थोडा डेटा खूप मजा
छंद किती स्वस्त आहे
एका वाक्यात खचतं कोणी
फीलिंग किती मस्त आहे
नवीन डेटा पॅक दे रे, आभाळावर थुंकीन म्हणतो
नवीन डेटा पॅक दे रे…

– सलील कुलकर्णी


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News