पुणे : महापुरुषांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचं पेव सध्या हिंदी सिनेसृष्टीत आलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती संभाजी महाराज या महापुरुषांच्या चरित्रावर चित्रपटांनंतर आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 11 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. अनंत महादेवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांची या सिनेमात प्रमुख भूमिका असणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमानंतर त्यांचे राज्यभरात राजकारणात उमटलेले पडसाद विस्मृतीत गेलेले नसतानाच महात्मा फुले यांच्या चित्रपटावर आधारित सिनेमावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदू महासंघाच्या वतीनं या सिनेमाच्या ट्रेलरवर आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा जातीयवाद पसरवण्यात येत असल्याचा आरोप करत आनंद दवे यांनी या सिनेमावर आक्षेप घेतलाय

काय म्हणालेत आनंद दवे
या चित्रपटाचं स्वागत करतो अशी सुरुवात आनंद दवे यांनी केली असली तरी सिनेमातील काही दृश्यांना आणि ट्रेलवरवर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकताना दिसतो. हा प्रकार दाखवण्यास विरोध नाही, मात्र महात्मा फुले यांच्या शाळेसाठी मदतीचे हात देणारे, देणग्या देणारे, शाळेत शिक्षक असणारे ब्राह्मणच होते, ते ट्रेलरमध्ये का दाखवण्यात आले नाही, असा सवाल दवे यांनी केला आहे. चित्रपटात याचा उल्लेख असेल तर ट्रेलरमध्ये याचा समावेश का नाही, असा आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा राज्यात जातीयवाद घडवून आणायचा आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. चित्रपट वास्तवाला धरुन नसेल तर ते योग्य नाही असंही दवे म्हणालेत.
त्या त्या काळात काही व्यक्ती विचित्र वागल्या असतील, ते दाखवण्याला आक्षेप नाही, असंही त्यांनी सांगितलंय. मात्र निर्माते आणि सेन्सॉर बोर्डानं याचा विचार करायला हवा असंही दवे म्हणालेत. चित्रपटात आवश्यक बदल करण्याची मागणी करत काही दिवस चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणीही दवेंनी केली आहे.
चित्रपट 11 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन पाहणार आणि चित्रपट एकांगी वाटला तर त्याबाबत भूमिका घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत.
दुसरीकडे दवे यांच्या या भूमिकेला विरोध करणाऱ्याही प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील ढसाळ यांनी दवेंच्या विरोधात भूमिका मांडली आहे.
काय म्हणालेत स्वप्नील ढसाळ?
काही संघटनांनी फुले सिनेमातील ब्राह्मण मुलांच्या शेण फेकण्याचा दृश्यांना आक्षेप घेतलाय. त्या संघटनांना दलित पँथर इशारा देऊ इच्छिते की चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या पाठिशी आम्ही आहोत आणि 11 एप्रिलला सिनेमा रिलिज करण्यासाठी दलित पँथर त्यांच्या पाठिशी उभी असेल.
छावा सिनेमाच्या ट्रेलरवरुनही असाच वाद रंगला होता. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत असल्याच्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर सिनेमातील काही दृश्ये वगळण्यात आली होती. आता फुले सिनेमातील वादाच्या पार्श्वभूमीवर पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.