बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘किंग’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण शाहरुख खान गेल्या दीड वर्षांपासून पडद्यावर दिसला नाही, त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. आधी असे म्हटले जात होते की हा चित्रपट २०२६ च्या ईदला प्रदर्शित होईल. पण आता चित्रपटाची नवीन प्रदर्शन तारीख जाहीर झाली आहे.
पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा मल्टीस्टारर चित्रपट ‘किंग’ २०२६ मध्ये गांधी जयंतीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की २०२३ मध्ये तीन ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, शाहरुख खान सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटाद्वारे इतिहास रचणार आहे.

शाहरुख खानचा ‘किंग‘ ब्लॉकबस्टर होणार!
“‘किंग’ सारख्या भव्य बॉलिवूड चित्रपटासाठी ही तारीख परिपूर्ण आहे,” असे एका सूत्राने म्हटले आहे. शुक्रवार आणि नॅशनल हॉलीडे असल्याने, या तारखेपासून चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात मिळण्याची अपेक्षा आहे. ‘किंग’ बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा ओलांडून ब्लॉकबस्टर ठरू शकतो.
पिंकव्हिलाच्या मते, ‘किंग’ चित्रपटासाठी शाहरुखच्या बॉडी डबलचे काही अॅक्शन सीक्वेन्स आधीच शूट झाले आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या सेटमधून काहीही लीक होऊ नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
‘किंग‘ मधील स्टार कास्ट आणि त्यांच्या भूमिका
‘किंग’ हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याची मुलगी सुहाना खान देखील या चित्रपटाचा भाग आहे. याशिवाय ‘किंग’मध्ये अभिषेक बच्चन, अभय वर्मा, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अर्शद वारसी आणि अनिल कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.
‘किंग’ मध्ये सुहाना खान शाहरुख खानच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारणार आहे. तर अभय वर्मा या चित्रपटात सुहानाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. तर राणी मुखर्जी सुहानाच्या आईची भूमिका साकारणार आहे.