Thane Crime – भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर पाकिस्तानी व बांग्लादेशी नागरिकांची कसून तपासणी व चौकशी सुरु आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवले जात आहे. तर जे संशयित असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली होती. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातील कळव्यात राहणाऱ्या रवी वर्मा या व्यक्तीला अटक केली होती. तर आता रवी वर्माकडून धक्कादायक माहिती समोर येतेय.
रवी वर्मा नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल इंजिनियर
दरम्यान, अटक केलेला रवी वर्मा हा पाकिस्तानचा संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी दोन पाकिस्तानी व्यक्तींच्या फेसबुकची नावे समोर आली आहेत. तर रवी वर्माने तब्बल १४ सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी अकाऊंट्सला पाठवली आहे. रवी वर्माने नेव्हल डॉकमधल्या युद्धनौकांची माहिती या फेसबुक अकाऊंट धारकांना पाठवली. तसेच युद्धनौका तसेच इतर जहाजाची माहिती आणि चित्रही बनवून पाकिस्तानला पाठवली आहे. अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

चित्र काढून माहिती पाठवायचा…
दुसरीकडे रवी वर्मा हा नोव्हेंबर २०२४ पासून पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात होता. नेव्हल डॉकमधल्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी असल्याने आरोपी रवी वर्मा तिथल्या युद्धनौकांचे स्ट्रक्चर आणि इतर माहिती लक्षात ठेवायचा आणि त्यानंतर ती पायल शर्मा आणि इस्प्रीत या अकाउंटला पाठवायचा. तसेच आरोपी रवी वर्मा ही माहिती ऑडियो आणि टेक्स्ट स्वरूपात तसेच चित्र काढून पाठवायचा असेही तपासात समोर आले आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेला रवी वर्मा ही माहिती पायल शर्मा आणि इस्प्रितला वारंवार पाठवत होता.