गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, राज्य सरकारच्या चौकशी अहवालात स्पष्ट

पुणे : तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलंच वादात सापडलं आहे. आता राज्य सरकारच्यावतीनं या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीतही मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलीस आयुक्तालयात सादर करण्यात आला.

त्यात गर्भवती महिलेला साडे पाच तास उपचाराविना बसवून ठेवण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालात काय ठपका ठेवण्यात आलाय ते स्पष्ट केलंय.

साडे पाच तास उपचार केले नाहीत…

गर्भवती महिला तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात साडे पाच तास बसवून ठेवण्यात आलं. सकाळी 9 वाजता रुग्ण आल्याची नोंद आहे. अडीच वाजता भिसे रुग्णालयातून बाहेर पडल्या. मात्र या साडे पाच तासात रक्तस्राव होत असतानाही कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. रक्तस्रावाबाबत तुमच्याकडे काही औषधे असतील तर तुम्हीच घ्या, असा सल्लाही दीनानाथच्या डॉक्टरांनी रुग्णांना दिला. रक्तस्राव होत असतानाही महिलेवर उपचार न केल्याचा ठपका चौकशी अहवालात मांडण्यात आलेला आहे.

रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी

रक्तस्त्राव होत असलेल्या तनिषा भिसे यांच्यासमोरच रुग्णाच्या नातेवाईकांकडे 10 लाखांची मागणी रुग्णालयाच्या वतीनं करण्यात आली. पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वी ही मागणी करण्यात आली. कुटुंबीयांनी आता 3 लाख आहेत, ते घ्या इतर पैशांची व्यवस्था दुसऱ्या दिवसापर्यंत करतो अशी कळकळीची विनंती केली. मात्र रुग्णालयानं त्याची कोणतीच दखल घेतली नसल्याचंही समोर आलं आहे.

या सर्व प्रकारामुळं पीडित तनिषा आणि त्यांच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती खचली, असाही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. साडे पाच तास थांबूनही उपचार न झाल्यानं अखेरीस रुग्ण महिलेला सूर्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं उपचारही झाले, मात्र महिलेचा मृत्यू झाल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे.

रुग्णाची गोपनीय माहिती रुग्णालयातून बाहेर

तनिषा यांची मार्चपासून दीनानाथमध्ये डॉ. घैसास यांच्याकडे उपचार सुरू होते. रुग्णाची मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहीत होती, घटना घडल्यानंतर दीनानाथनं अंतर्गत चौकशीसाठी समिती नेमली. या समितीच्या अहवालात रुग्णाची वैयक्तिक माहिती जाहीर करण्यात आली. हा अहवाल माध्यमांनाही देण्यात आला. यात भिसे कुटुंबाची गोपनीय माहिती जाहीर झाल्याचं सांगत, चाकणकर यांनी याचा निषेध नोंदवला आहे.

दोन समित्यांच्या अहवालानंतर कारवाई

राज्य सरकारच्या चौकशीत दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचं समोर आल्यानंतर आता माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मदाय चौकशी समितीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. या तिन्ही चौकशी अहवालाच्या आधारे कारवाई करण्यात येईल, असंगी चाकणकर यांनी स्पष्ट केलं आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News