कल्याण: कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात आत्महत्या केली. याबाबत आता माहिती समोर आली आहे. कल्याण बलात्कार प्रकरणात चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा आणि नंतर तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीचा एन्काऊंटर करा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून केली जात असताना विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
डिसेंबर महिन्यात केला होता बलात्कार:
डिसेंबर महिन्याच्या 23 तारखेला विशाल गवळीने एका चिमुरडीचं अपहण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिची हत्या केली. बदलापूर प्रकरण ताजं असताना हा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी घडलेली घटना अशी होती की, 23 डिसेंबरला संध्याकाळी कल्याण पूर्वेतून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. अल्पवयीन मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. अल्पवयीन मुलगी परत न आल्याने कुटुंबाने मुलीचा शोध सुरू केला. मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली. 24 डिसेंबर रोजी मुलीच्या मृतदेह कल्याणनजीक बापगाव परिसरात सापडला. मुलीच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे हॉस्पिटलला पाठवण्यात आला.शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले की मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेत विशालच्या पत्नीची त्याला साथ मिळाली होती.

अलीकडे विशाल गवळीची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. त्या ठिकाणी त्याचा एन्काऊंटर करावा अशी मागणी पिडीत मुलीच्या कुटुंबाकडून केली जात होती. दरम्यान विशाल गवळीने स्वत:च आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कोण होता विशाल गवळी?
विशाल गवळीने याआधी असे अनेक प्रकार केले होते. 2016 साली एका अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार प्रकऱणात गवळीचे नाव समोर आले होते. त्यानंतर 2019 साली त्याला तडीपार करण्यात आले होते. पण गवळीने अनेकदा आदेशाचा भंग केला. त्याचे कारनामे सुरूच राहिले, 2021 साली त्याचे पुन्हा एकदा एका लैंगिक अत्याचारात नाव समोर आले होते. काही ठिकाणी लुट आणि दरोडे अशा घटना घडत असतात. त्यातही त्याचे नाव समोर आले आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्याने कल्याणमध्ये चिमुरडीवर अत्याचार करत हत्या केली होती.