आयकर विभागाने रोजंदारीवर काम करणाऱ्या एका मजुराला चक्क 314 कोटींची नोटीस पाठवल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. हा मजूर मूळचा मध्य प्रदेशातील असून सध्या तो नागपुरातील मुलताईतील आंबेडकर वॉर्ड येथे राहतो. त्याचं नाव चंद्रशेखर पंडितराव कोहाड आहे. आयकर विभागाने चंद्रशेखर कोहाड यांना 4 एप्रिल रोजी ही नोटीस पाठवली आहे. आयकर न भरल्यामुळे त्यांना ही नोटीस आली आहे.
नागपुरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या कोहाड रोजंदारीसह दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे मासिक उत्पन्न जेमतेम काही हजारांच्या घरात आहे. कसं बसं पोटाची खळगी भरणाऱ्या कोहाडांना चक्क 314 कोटींची आयकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस पाहून कोहाडांच्या पत्नीला धक्काच बसला आहे.

कोटींच्या वसुलीची नोटीस…
नागपूर आयकर विभागाने मुलताईतील आंबेडकर वॉर्डचे निवासी चंद्रशेखर पंडितराव कोहाड यांना 314 कोटी रुपयांची वसुलीची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आल्यानंतर चंद्रशेखर यांचं आयुष्य बदलून गेलं आहे. त्यांची पत्नी आधीपासून आजारी असते. ही नोटीस पाहून ती अधिकच अस्वस्थ झाली आहे. कोहाडांचंही टेन्शन वाढलं आहे. याशिवाय आयकर विभागाचा फेरा सुरू झाल्याने त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जात आहे.
चंद्रशेखर मजुरीचं काम करतात…
चंद्रशेखर कोहाड रोजंदारीवर काम करतात. ते म्हणतात, मी कोणतेही व्यवहार केलेले नाहीत. घरातील लोक खूप तणावात आहेत. माझी तब्येतही बरी राहत नाही. असं का घडतंय मला कळत नाही. दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे एक नोटीस मिळाली होती. ज्यावर नागपूरमध्ये आयकर विभागाच्या कार्यालयात अर्ज केला होता. नोटीस मिळाल्यापासून माझ्या पत्नीची प्रकृती अधिक बिघडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर कोहाड यांनी 2013-14 या आर्थिक वर्षात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचा संशय आयकर विभागाकडून व्यक्त केला जात आहे. यासंदर्भातील काही पुरावेही विभागाच्या हाती लागल्याची माहिती आहे.
नागपूर न्यूज, आयकर विभाग, ३१४ कोटींची नोटीस, ३१४ कोटींची वसुली नोटीस, मजुराला आयकर विभागाची नोटीस, चंद्रशेखर कोहाड, नागपूर न्यूज, मध्य प्रदेश न्यूज, नागपूर क्राइम, नागपूर आयकर विभाग