तुळजापुरात भाविक आदिशक्तीच्या दर्शनाला येत असतात. तुळजापूर म्हणजे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. महाराष्ट्रभरात तुळजापुरात भाविक भक्तीभावाने दाखल होत असतात. मात्र एका घटनेनंतर तुळजापूर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं आहे. कारण आहे पुजाऱ्यांचं ड्रग्ज कनेक्शन.
ही बातमी वाचून अनेकांना धक्का बसेल. मात्र हे सत्य आहे. तुळजापुरात फेब्रुवारी महिन्यात एक कारवाई करण्यात आली, या कारवाईत मोठ्या संख्येने ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तळाशी गेलं तर पुजाऱ्यांचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. हा सर्व प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

ड्रग्स आणि पुजारी, नेमकं प्रकरण काय?
तामलवाडी टोल नाक्यावर 14 फेब्रुवारी रोजी एक कारवाई करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास तामलवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमध्ये तीन आरोपींकडून 59 ड्रग्ज पुडया जप्त करण्यात आल्या. या प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपींचा शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात 13 पुजाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. पुजारी मंडळांकडून या 13 पुजाऱ्यांच्या नावांची यादी मागविण्यात आली होती. तर ड्रग्स प्रकरणात सापडलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दैनंदिन पुजेशी संबंध नसल्याचं पुजारी मंडळाकडून सांगण्यात येत आहे.
ड्रग्समुळे तरुणाई धोक्यात
ड्रग्ज प्रकरणात पुजारी सहभागी असल्याच्या चर्चांमुळं पुजारी मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया देत संपूर्ण पुजारी वर्ग दोषी नाही, अशी भूमिका मांडली आहे. मुळात धाराशिवचा हा विषय पुजाऱ्यांचा सहभाग असल्यामुळे चर्चेत आलं असलं तरी, त्या पलीकडे जाऊन हे ड्रग्जचं प्रकरण आहे. हे ड्रग्ज संपूर्ण तरुणाई नासवू शकतात. त्यामुळं, आरोपी कोण आहेत, ते पुजारी आहेत की नाही, मंदिरात येतात की नाही, त्यांचे आणखी काही व्यवसाय आहेत की नाही याविषयावर चर्चा होण्यापेक्षा गरजेचं आहे ते या रॅकेटची सखोल चौकशी होणं आणि समूळ नायनाट होणं.