ठाणे जिल्ह्यात अनाधिकृत वसतिगृहातून 29 बालकांची सुटका; संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने या प्रकरणी तत्परतेने कार्यवाही केली असून, बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

ठाणे – सध्या लहान मुलांवरील होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पाऊले उचलली जातात. मुंबईलगत ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे ‘पसायदान विकास संस्था’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत 29 बालकांची सुखरुप सुटका केली आहे. या घटनेमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गुन्हा दाखल…

दरम्यान, या प्रकरणी घटनेची गंभीर दखल घेत संस्थेचे संचालक, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि त्यांना मदत करणारे दोन अशा एकूण पाच जणांविरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेत बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्प लाईनवर प्राप्त झाली होती. यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या कारवाईनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, अन्य ठिकाणी पण तपास सुरु करण्यात येत आहे. सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते.

बालकांना शारीरिक मारहाण…

या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या 29 बालकांची सुटका केली. यामध्ये 20 मुली आणि 9 मुलांचा समावेश आहे. संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचेल, अशा प्रकारे मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. जिल्हाधिकारी यांच्या माहितीनुसार, 10 एप्रिल 2025 रोजी चाईल्ड हेल्प लाईनवर कल्याण तालुक्यातील खडवली येथील ‘पसायदान विकास संस्था’ बाबत तक्रार आली होती. या प्रकरणी संस्थेचा संचालक बबन नारायण शिंदे, त्यांची पत्नी आशा बबन शिंदे, संचालक मुलगा प्रसन्न बबन शिंदे, त्यांना मदत करणारा प्रकाश सुरेश गुप्ता आणि दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News