Pune Crime: कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला, नेमकं काय घडलं?

पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला, कुस्तीच्या फडात हा प्रकार घडल्याने...

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडल्याचं समजतं. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून केला. या पैलवानाने निलेश घायवळ याला मारहाण केल्याचे समजते.

घायवळच्या कानाखाली आवाज काढला अन्…

निलेश घायवळ या स्पर्धेच्या आयोजनानंतर या ठिकाणी आला, दरम्यान गर्दीतील एका पैलवानाने घायवळच्या थेट कानाशिलात लगावली, आजुबाजूचे लोक लगेच निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. घायवळ समर्थकांनी या पैलवानाला चोप दिला हल्ला करणारा पैलवान हा  अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचे समजते. निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

घटनेचा व्हिडिओ आला समोर…

या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक चालताना दिसत आहे. हे सर्वजण कुस्तीच्या फडात पहिलवानांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी समोरच उभ्या असलेला पैलवान निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. या पैलावानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारली. त्यानंतर हा पैलवान निलेश घायवळला आणखी मारहाण करण्याच्या बेतात होता. परंतु घायवळच्या समर्थकांनी पैलवानाला चोप दिल्याने तो पळाला.

पुण्याच्या गुन्हेगारी जगतामध्ये घायवळने या आधी अनेक कारनामे केलेत. निलेश घायवळ याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.

घायवळवर हल्ला करणारा पैलवान पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News