श्रीनगर: जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ल्याची घटना घडली, त्यामध्ये कित्येक पर्यटक मृत्यूमुखी पडले. हजारो पर्यटक सध्या त्या भागात अडकून आहेत. हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून आपल्या राज्यात परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडत आहे.
देशावर संकट, विमान कंपन्या संधीसाधू
देशावरील दहशवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवले आहेत. सोशल मीडियावर तिकीटाचे दर शेअर करण्यात आले आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर, नागरी उड्डाण विभागाने देशभरातील एअरलाईन्सला निर्देश दिले आहेत. विमानकंपन्यांनी तिकीट रद्दचे चार्ज आणि पुनर्नियोजनाचे चार्ज न लावण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. तसेच, विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर आता या सेवांमध्ये काही सुधारणा होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नागरी उड्डाण विभागाने नेमकं काय म्हटलं?
Aftermath of Pahalgam terror attack, DGCA issues advisory to airlines over surge in pricing and waiving cancellation charges: DGCA pic.twitter.com/GHzerH1NSw
— ANI (@ANI) April 23, 2025
आता डिजीसीएने जारी केलेल्या आदेशानंतर विमानाच्या तिकीट दरांमध्ये काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहेत. दक्षिण काश्मिर खोऱ्यात सध्या भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी पर्यटक आपल्या राज्यात परतत आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव काही नागरिक देखील प्रवास करत आहेत.
पहलगाम येथील दुर्घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटकांकडून आपल्या मायभूमीत परतण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे, श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्या यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, हजारो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मिरला आले आहेत. मात्र, दहशतवादी हल्ल्यानंतर ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे, स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएने विमान कंपन्यांना दिले आहेत.