मुंबई: राज्यातील मंदीरं, मशिदी, दर्ग्याचे वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीत. मुंबईतील विलेपार्ले भागात असलेल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर दोन दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेकडून हातोडा फिरवत ते जमीनदोस्त करण्यात आले होते. आता या प्रकरणावरून मोठा वाद पेटला आहे. जैन समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. यामध्ये पुढे नेमकं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जैन समाज झाला आक्रमक
दोन दिवसांपूर्वी पालिकेने 90 वर्षे जुने विलेपार्ले परिसरातील हे मंदीर जमीनदोस्त केले. मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर मुंबईत जैन समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकेने जैन मंदिरावर केलेल्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली . जैन समाज शांतताप्रिय समाज म्हणुन ओळखला जातो. काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने जैन समुदायातील महिला आणि पुरूषांचा सहभाग दिसून आला.

‘मंदिर तुटा, हौसला नही,’
असे बोर्ड हाती घेऊन शनिवारी सकाळी 9.00 वाजेपासून जैन समाजाकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी पालिकेकडून कारवाई करण्यात आली त्याच जागेवर पुन्हा पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर उभारावे अशी मागणी जैन समाजाकडून करण्यात येत आहे. आता या प्रकरणावर पालिका नेमकी काय प्रतिसाद देते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बेकायदेशीर कारवाई?
हायकोर्टाने तोडक कारवाईला स्थगिती दिल्यानंतरही महापालिकेच्या के ईस्ट वॉर्डचे अधिकारी नवनाथ घाडगे यांनी मनमानी आदेश देऊन ही कारवाई केली होती. पोलीस बंदोबस्तात दिगंबर जैन मंदिर जेसीबीच्या सहाय्याने फक्त काही मिनिटांत जमीनदोस्त करण्यात आले. 16 एप्रिल रोजी सकाळी 8:00 वाजता कोर्ट सुरू होण्यापूर्वीच मंदिर जमीनदोस्त करण्यात आले होते. त्यामुळे आता प्रकरणात पुढे काय घडत ते पाहणं महत्वाचं असेल.
राज्यात मंदिर, मशिदींचे वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीत. नाशिकमधील दर्ग्याचा वाद नुकता मिटतो न मिटतो तोवर आता नव्या वादाने तोंड वर काढले आहे. बेकायदेशीर कारवाईमुळे जैन समाजात असंतोष आहे.