मुंबई – मुंबई क्रिकेट असोसिएशनची मंगळवारी सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमधील स्टॅन्डला तीन जणांची नाव देण्याचा निर्णय एमसीएच्या सर्वसाधारण बैठकीत घेण्यात आला आहे. तिघांमध्ये दोन क्रिकेटपटू तर एक राजकीय नेता आहे. तसेच एमसीएच्या बॉक्सला स्वर्गीय अमोल काळे यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. मंगळवारी एमसीएची सर्वसाधारण बैठक पार पडली.
३ नावे कोणाची?
दरम्यान, सध्याच्या घडीला देशातील सर्वात अनुभवी राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (एसपी) शरद पवार, माजी कसोटीपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार तसेच ज्याने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली असा स्फोटक फलंदाज क्रिकेटपटू रोहित शर्मा. या तिघांची वानखेडे स्टेडियमधील स्टॅन्डला नाव देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, ग्रँड स्टँड लेवल 3 स्टँडला शरद पवारांचं नाव दिलं जाणार आहे. ग्रँड स्टँड लेवल 4 ला अजित वाडेकर यांचे नाव दिले जाईल, आणि दिवेचा पॅवेलियन लेवल 3 ला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचें नाव देण्यात येणार आहे. याबाबत मिलिंद नार्वेकरांनी प्रस्ताव मांडला होता. तर जितेंद्र आव्हाडांनी याला अनुमोदन दिले. हा निर्णय एकमताने मंजुर करण्यात आल्याची माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली आहे.

येणाऱ्या एमसीएचा इतिहास कळावा…
एमसीएमधील इतिहास आणि क्रिकेटची माहिती येणाऱ्या भावी पिढीला कळावी. यासाठी एमसीएचा प्रयत्न आहे. म्हणून मंगळवारच्या सर्वसाधारण बैठकीत ३ जणांची नाव वानखेडे स्टेडियममधील स्टॅन्डला देण्याचा आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच एमसीएचा बॉक्स आहे, त्या बॉक्सला एमसीएचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अमोल काळे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली आहे. त्यामुळं वानखेडे स्टेडियममधील स्टॅन्डला आता रोहित शर्मा, शरद पवार आणि अजित वाडेकर या तिघांची नावे दिसणार आहेत.